Saturday 18 April 2009

मुंबईचे दिवस : २ : प्राथमिक शाळा

आता मला वेगाने वाचता यायला लागले. काय वाचू, किती वाचू असे झाले. घरात दैनिक मराठा येत असे. पण त्यात काहीहि छान छान नव्हते. वाचता यायचे. पण अर्थ कळत नसे. कशाला घ्यायचे कोणाला माहीत. चांदोबा महिन्यातून एकदाच यायचा. तो मस्तच असायचा. त्यात गोष्टींबरोबर चित्रेहि असत. आई रोज बाजारातून येतांना चणेशेंगदाणे आणायची. त्याच्या लांबट टोकदार पुड्या वहीच्या कागदाच्या असायच्या. मुलांनी लिहिलेल्या कागदाच्या. ते वाचायला जास्त मजा यायची. कधी गणिते. कधी निबंध. कधी प्रश्नोत्तरे. बागवेकाका अण्णांचे बालमित्र होते. दत्तू बागवे. अण्णांचे बालमित्र. आमचे कांदळगांव मालवणपासून साताठ कि.मी. बागवेकाकांचे गाव ‘मसुरे’. मालवणपासून पंधरावीस कि.मी. दोघेहि मालवणला एकाच शाळेत शिकले होते. बागवेकाका धोतर नेसत. वर पांढरा शर्ट. इस्त्री न केलेला. जीभ पानाने लालभडक झालेली. पण ओठांना मात्र पानाचा रंग नाही. तोंड बंद असतांना नुसते पाहून कळणार नाही की हे पान खातात म्हणून. पण जवळ आले की पानचुन्याचा तिखट वास लपत नसे. डोक्यावर चांदोबा. भोवती काळ्यापांढर्‍या झिरमिळ्यांची चंद्रकोर. पालिकेच्या शाळेत मास्तर होते. आले की प्रथम माझी तक्रार ऐकून घेत. त्यांच्या परममित्राविरूद्धची म्हणजेच आमच्या तीर्थरूपांविरूद्ध. मग दादाची. मग त्यांच्या वहिनीची. म्हणजे आमच्या आईची. मग आमच्यासमोर त्यांना चांगलेच फैलावर घेत. वासू, का रे सगळ्यांना ओरडतोस? जरा सगळ्यांशी प्रेमाने वागायला शीक! वगैरे वगैरे. आम्ही खूश होत असू. ‘कशी मस्त जिरली!’ असे काहीसे वाटत असे. त्यामुळे बागवेकाका आमच्या सगळ्यांचे आवडते होते. पण हा दम द्यायचा समारंभ झाला की मग दोघे चहापाणी घेत व गळ्यात गळे घालून फिरायला जात. असेच एकदा ते आले. नेहमीचा सोहळा आटोपल्यानंतर त्यांनी मला कपडे करायला सांगितले. मी कपडे केले. त्यांनी मला हाताला धरले व सरळ महापालिकेच्या शाळेत नेले.


जून १९५९. माझे वय वर्षे सात पूर्ण. माझ्या अंगावर कडक इस्त्री केलेला निळसर रंगाचा बुश शर्ट आणि तशीच कडक इस्त्री केलेली गर्द रंगाची अर्धी पाटलोण. पायात लाल पठाणी बूट. आमची आई तशी हौशी. घरात घालायचे कपडे देखील ती आम्हाला इस्त्री करून देत असे. आमच्या घरी सखूआजी - आईची मावशी असे. कमरेत किंचित वाकलेली. केस पूर्ण काळे. चष्मा नाही. कपाळावर लालभडक ठसठशीत कुंकू. तोंडी फक्त मालवणी. असंख्य म्हणींनी समृद्ध झालेली. तिचे यजमान मसुर्‍याला की बांदिवड्याला खोत होते. खोतच ते. रंगढंगाशिवाय खोत कुठला असायला? त्यांनी एका तरूण बाईशी गंमत सुरू केल्यामुळे सखूआजी रागाने आमच्या घरी राहायला आली. मराठा वाचायची. सही करण्यापुरते लिहिणे ठाऊक होते. ती असल्यामुळे अशी कामे करण्यासाठी आईला भरपूर वेळ असे. सनलाईट साबणाचा वास इस्त्री केल्यावर वेगळा होऊन दरवळे. इस्त्री केलेले कपडे घातल्यावर काहीतरी छान वाटायचे. उगीचच आनंदी, चकचकीत वाटायचे. मन हलके होई. उड्या माराव्या, खेळावे, गावे नाचावे असे वाट्टे. आईला पण तसे वाटायचे की नाही माहीत नाही. ती नऊवारी पातळ नेसायची. पातळाला तिने कधी इस्त्री केली नाही. हो. कधीच नाही. पण आमच्या कपड्यांना इस्त्री करतांना मात्र ती फुलून जात असे. जसे आम्ही ते कपडे घातल्यावर फुलून जात होतो. एरवी तिला तसे तेवढे फुललेले मी अनेकदा पाहिले होते. दोनपाच वर्षानंतर एकदा ती आणि आजी दोघीजणी अण्णांच्या नकळत सुवासिनी चित्रपट पाहून आल्यावर. मावशीची मोठी मुलगी माई तिच्यापेक्षा चारच वर्षांनी लहान होती, ती आली की ती अशीच फुलून जात असे. माई, बेबी, पपी, सरू आणि हेमा या मावशीच्या मुली. बाळा, लल्लू, विदू हे मावशीचे मुलगे. माई, बेबी, पपी आणि सरू यांचे व आईचे काहीतरी नेहमीच गुपित चाले त्या आल्या की त्या सगळ्या अशाच फुलून जात असत. फुलांचा, गजर्‍यांचा, वेण्यांचा सुगंध आणि त्यांच्या हास्याच्या लकेरी आसमंतात दरवळत. हेमा मात्र माझ्या बरोबरची. तिची माझ्याशीच गट्टी होती.


दादरची ‘राम मारूती रोड म्यु. अप्पर प्रायमरी मराठी शाळा.’ बागवेकाकांच्या ओळखीचे एक शिक्षक होते. म्हसकर मास्तर म्हणून. कोणत्या शाळेत ठाऊक नाही. राम मारूती रोड शाळेच्या जोशी बाई म्हसकर मास्तरांच्या ओळखीच्या. शाळा आतून बाहेरून पिवळी. जमीन हिरवी खाकी सिमेंटची. बरोबर मारुती मंदिरासमोर शाळेचा जिना. मंदिर कसले! बाहेरून मंदिर नसलेला फक्त गोल गाभारा. बाहेरून निळा तेलरंग. कळसाला लाल तेलरंग. दरवाजा नाहीच. प्रवेशचौकटीत दानपेटी. कोकणात याला घुमटी म्हणतात. शाळाभर शेंदराचा, तेलाचा, उदबत्त्यांचा, फुलांचा - देवळाच्या गाभार्‍यात येतो तसा वास दरवळलेला असे. लाकडी जिन्यावरून पहिल्या मजल्यावर आल्यावर रस्त्याला लागून गॅलरी. गॅलरीतून उजवीकडे वळलो. टोकाला कोपर्‍यावर शाळेचे हपिस. तिथे एका टेबलाशी जोशी बाई बसल्या होत्या. टेबलावर पांढराशुभ्र अभ्रा. अभ्र्यावर काच. वर चकचकीत स्टीलचा तांब्यापेला, घंटी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत अस्टरची फुले. जोशीबाई निळ्या काठाचे पांढरे गोल धुवट पातळ नेसलेल्या. कपाळावर काळे कुंकू. (हे तपशील पुढे बेबी चवंडेने पुरवले. माझ्या कुठले लक्षात यायला!) तिथे उजव्या हाताला भिंतीला लागून एक बाक होते. तिथे मला बसवले. बागवेकाका जोशीबाईंच्या समोरच्या खुर्चीवर बसले.


जोशीबाईंच्या खोलीतील बाक मजेदार आणि जादूचे होते. मागे टेकायला बाकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत टेकायला फळीची पाठ होती. बाकांच्या दोन्ही बाजूंना अर्धवाटोळ्या दणकट लोखंडी पट्ट्या होत्या. बाईंनी दोन मोठ्ठया मुलांना बोलावले. त्यांनी मला उठून बाजूला उभे राहायला सांगितले. बाक जरा पुढे सरकवले. मागे टेकायची बाजू उचलून पुढे ठेवली. बाकाच्या त्या पाठीचे आता डेस्क झाले होते. बाकावर पाच मुलांची जागा होती. डेस्कवर प्रत्येकाच्या उजव्या बाजूला डेस्कला गोल खोबण होती. गडद काळीनिळी. शाई ओतायला. किंवा दौत ठेवायला. मला खूपच नवल वाटले. डेस्कवर काय काय कोरून लिहून ठेवले होते. डावरा मुलगा काय करेल हे मात्र तेव्हा डोक्यात आले नाही. बावळटच होतो. तिथे ऐटीत जाऊन बसलो.


जोशी बाईंनी नेरूरकर बाईंना बोलावले. निळसर रंगाचे गोल पातळ नेसल्या होत्या. त्या जवळ आल्यावर डोक्यातल्या फुलांचा आणि पावडरचा छान वास आला. त्यांनी मला एक धडा वाचायला दिला. माझा आवाज खणखणीत. तशी मला कोणाचीहि भीती वाटत नसे. पण फक्त माणसांचीच. भुतांची, राक्षसांची व प्राण्यांची वाटे. कुत्र्यांची, गुरांची तर फारच वाटे. धडाधड एक परिच्छेद वाचला. दुसरा परिच्छेद पाटीवर लिहायला सांगितला. तेव्हा माझे अक्षर सुंदर व वळणदार होते. दोन ढग हा धडा होता तो. लिहिले.


"याला फक्त मराठीच नाही तर ए बी सी डी पण लिहिता वाचता येते बरे का." बागवेकाकांनी फुशारकी मारलीच. "आणखी काय काय येते?" बाईंनी विचारले.


"शांताकारं, कराग्रे वसते लक्ष्मी, वदनी कवळ घेता, मारुतीस्तोत्र, बे ते बारा पाढे." मी.


दोन्ही बाई खूष झाल्या असाव्यात. पण तसे मुलांच्या तोंडावर स्तुति करण्याचा त्या काळी प्रघात नव्हता. त्यांच्या चेहर्‍यावर पण तसे दिसले नाही. चुकलो असतो तर प्रसाद जरूर मिळाला असता. चेहर्‍यावर काहीहि भाव न दाखवता थेट दुसरीत दाखल केले. महापालिकेची शाळा असून शाळेत कडक शिस्त असे. शाळेत शिरतांना रांगेतूनच जावे लागे. कुणीहि बेशिस्त वागत नसे. श्रीमंत - गरीब सर्व आर्थिक स्तरातून तसेच ब्राह्मण, बहुजनसमाज, मागासवर्गीय, सगळ्या जातीतून मुलेमुली येत. सगळ्यांना सारखी वागणूक मिळे. रोज लिहायला पाटीपेन्सिल. दर शनिवारी परीक्षा होत असे. अर्ध्या ए४ साईजचा आडवा पेपर, मुखपृष्ठावर छापील मजकूर असलेला. तेव्हा ५ पैशाना मिळे. प्रभात, ओसवाल वगैरे कंपन्यांचा असे. प्रभातवरचे चित्र विशिष्टच. खालून चपटे असलेले अर्धवर्तुळ. त्यापासून निधणारे सूर्यकिरण. उगवत्या सूर्याच्या उजव्या बाजूला नाव, इयत्ता, रोल नं., एकूण गुण, मिळालेले गुण, इ. छापलेला मजकूर. ते तपशील लिहायला त्यासमोर रिकामी ओळ. हा पेपर माझ्या मनावर असा ठसला आहे की तो अजूनहि मला तो जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. पेन्सिलने लिहावा लागे. सोमवारी तपासलेला मिळे. मी, सुभाष नारायण गडकरी, पालेकर नावाची एक मुलगी इ. पहिले तीनचार क्रमांक आलटून पालटून ठरलेले असत. दुसर्‍या तुकडीत सुधीर गडकरी नावाचा एक मुलगा होता. तसा येडबंबूच होता. पण वर्गात कायम पहिल्या क्रमांकावर असे. (एऽऽक दोऽऽन तीऽऽन चाऽऽर. सुधीऽऽर नावाऽऽचीऽऽ पोऽऽरे हुशाऽऽर) आमच्यापेक्षा पाचसहा वर्षांनी मोठी असलेली मुलेमुली पण आमच्या वर्गात होती. परीक्षेत त्यांचे क्रमांक बहुधा शेवटचेच येत.


नेरूरकर बाई देखण्या नसल्या तरी नीटनेटक्या होत्या. एरवी त्या एक शेपटा पाठीवर सोडीत. सणावारी आंबाडा असे. व आंबाड्याभोवती डौलदार वेणी. हे मला आमच्या इमारतीतीत बेबीने दाखवले. मुलांना या गोष्टी कुठून दिसणार! त्या जवळ आल्या की फुले व पावडर याबरोबर त्यांच्या साडीच्या स्टार्चचा देखील वास येई. बेबी चवंडे माझ्यापेक्षा पाचसहा वर्षाने मोठी. मला न दिसणार्‍या बर्‍याच गोष्टी तिला सहज दिसत. हा तपशील तसेच जोशीबाईंचा तपशील पण तिनेच पुरवलेला. उजव्या बाजूच्या काही रांगा मुलींच्या होत्या. नेरूरकर बाई दुसरीला सगळे विषय शिकवीत होत्या. त्या फारच प्रेमळ होत्या. मुलांनी कधी फारशी मस्ती केली नाही. त्यांनी कधी कोणाला कधी शिक्षा केली नाही वा मारले नाही. कोणी मस्ती केलीच तर त्या मित्रत्त्वाच्या नात्याने समजावून सांगत की असे करू नये. तरी हूड मुलेमुली कधीतरी मस्ती करीतच. कविता तर छानच समजावून सांगत. देवा तुझे किती सुंदर आकाश तर छानच शिकवली. मी खीर खाली तर बूड घागरी हा धडा शिकवतांना तर त्या आमच्यातल्याच एक झाल्या होत्या. दोनचारदा त्यांच्या लक्षात आले की मुले आज कंटाळली आहेत. मग त्या एखादी गोष्ट सांगत. एकदा तर त्यांनी किशोर मासिकात आलेली उसाच्या शेतातल्या चोरांची एक छान गोष्ट वाचून दाखवली होती. कधी कुणाला गाणे म्हणायला सांगत. सुनंदा खोत आमच्या विठ्ठलवाडीतच राहायची. सुभद्रा बिल्डिंगमध्ये. माझ्यापेक्षा पाचसात वर्षांनी मोठी असावी. नेहमी निळा स्कर्ट आणि पांढरे पोलके घालून यायची. ती छान गाणे म्हणायची. गातांना हातवारे करायची. उजवा पाय मागे उचलून तालावर आपटायची. गोरी गोरी पान, घरात हसरे तारे वगैरे गाणी मस्तच म्हणायची. आमच्या बालमनाशी बाईंनी एवढी जवळीक साधली होती की दुसरीच्या निकालाच्या वेळी पुढच्या वर्षी त्या नसणार म्हणून आम्हाला रडू आले. मग त्यांनी आम्हाला ‘आता हसा पाहू’ असे म्हणून एक सॉऽऽलिड बातमी दिली. तिसरीला पण आम्हा त्याच शिकवणार म्हणून. आम्ही आनंदाने टाळ्या, बाके वाजवून जल्लोष केला. वार्षिक शुक्रवार साजरा होत असे. पाच पाच पैसे वर्गणी आणायला सांगत. कुरमुरे, चणे, शेंगदाणे, कांदा वगैरे घालून लिंबू पिळून मोठ्या मुली सुकी भेळ बनवीत. देवीची आरती करायची व भेळ खायची. मज्जाच मज्जा. तिसरीत मात्र त्यांनी या दिवशी सांगितले की आता तुम्ही मोठे झालात. पुढल्या वर्षी तुम्ही चौथीत जाणार. पारखी मास्तर येणार. खूप छान शिकवतात. पण मस्ती केली तर पट्टीने मारतात. अशी मनाची तयारी अगोदरच तयारी करून घेतली. म्हणून निकालाच्या वेळी एकदोन लहान मुली सोडल्या तर बाई आमच्या वर्गावर नसणार म्हणून फारसे कोणी रडले नाही.


पारखी मास्तर छानच शिकवायचे. कोंबडा पाडायचे. असा कोंबडा नंतर बर्‍याच वर्षांनी सिनेमात देवानंदच्या केसांचा पाहिला. कडक इस्त्रीचे कपडे. पायात लाल बूट. शर्टाच्या पूर्ण बाह्या कोपरांच्या वरपर्यंत दुमडायचे. शर्टाला एक खिसा. खिशातून पेनची दोन चकचकीत टोपणे डोकवायची. एक काळ्या तर दुसरे लाल शाईचे. पण फारच कडक होते. उभ्या पट्टीने मारायचे. एक फटका बसला की हात लाल व्हायचा. दोनदोन दिवस दुखायचा. सप्टेंबरमध्ये मी दोनतीन आठवडे आजारी होतो. एके शनिवारी परीक्षा दिलीच नाही. तेव्हा तिमाही, सहामाही वगैरे परीक्षा नव्हत्या. दर महिन्यातील गुणांची बेरीज करून त्याप्रमाणे नंबर लावत. नंबर पार घसरला. अण्णांनी प्रगतीपुस्तकावर सही दिली नाही. सोमवारपासून शनिवारपर्यंत रोज दोन्ही हातावर एकेक उभी पट्टी खाल्ली. रविवारी आईला कधीतरी तळहातावर वळ दिसले. मग तिने सही घेऊन दिली.


शाळा जरी १०० - १५० पावलांवर होती तरा मला एकट्याने जायची भिती वाटत असेच. दादा मोठ्या मुलांच्याबरोबर जात असे. दोन दिवस आई शाळेत सोडायला व घरी न्यायला आली. बेबी चवंडे आमच्याच इमारतीत रहायची. माझ्यापेक्षा पाचसहा वर्षांनी मोठी. आईला तिने सांगितले की काकी तुम्ही काळजी करू नका. मी नेईन आणि आणीन याला माझ्याबरोबर. दिसायला गोरीपान, सुंदर होती. घरची गरिबी असली (तिचे बाबा वारले होते. आईच नोकरी करायची.) तरी नीटनेटकी राहायची. एक शेपटा घालायची. छानछान रिबिन बांधायची. गडद रंगांचे कपडे, स्कर्ट घालायची. कसलेतरी झाडपाल्याच्या छान वासाचे हिरव्या रंगाचे तेल ती केसांना लावत असे. ती चार पावलांच्या अंतरावर आली तरी तो छान वास येई. दुसरी आणि तिसरी दोन वर्षे तिने मला संभाळून शाळेत नेले. ती झरझर वेगाने पाटीवर लिहायची. अक्षराला मोठ्या माणसांसारखे विशिष्ट वळण होते. माझा गृहपाठ ती जसाच्या तसा उतरवून काढत असे. (बहुतेक म्हणूनच) ती तिसरीत नापास झाली व तिला तिच्या आईने शाळेतून काढले. पण तोपर्यंत मी मोठा झालो होतो. दादा, आमच्या इमारतीतले रवी, विजय म्हात्रे वगैरे त्याचे मित्र तर मला मुलीबरोबर चालत जातो म्हणून चिडवत असत. मला मात्र ती परीसारखी, राजकन्येसारखी वाटत असे. तिला परीसारखे पंख असते तर फार बरे झाले असते. तरी शेवटी शेवटी मला पण मुलीबरोबर चालायची लाज वाटायला लागली. पण तिला तिच्या आईने शाळेतून काढले आणि मी सुटलो. पण तिच्या सौजन्याचे न फिटणारे ओझे माझ्यावर आहेच.


घरून निघाले की कोपर्‍यावर डावीकडे फाटा फुटतो. डाव्या कोपर्‍यावर शाळा. उजवीकडे फाटा नाही. रस्ता सरळ व डावीकडे शाळेला लागून फाटा. उजव्या फूटपाथवर चिंचेच्या झाडाखाली कचर्‍याची गाडी उभी असे. तेव्हाच्या कचर्‍याच्या गाडीची एक गंमतच होती. मागे दोन चाके. पुढे फक्त टेबलाच्या पायासारखे चौकोनी पण लोखंडी पाय. त्याच्यापुढे कांगारूच्या पुढच्या लोंबत्या पायासारखी वीतभर व्यासाची दोन लोखंडी चाके. वरून अर्धागोलाकृती सरकदरवाजे. कचर्‍याची गाडी तसलाच रिकामा डबा घेऊन यायची. या डब्याच्या मागे उभी राहायची. मग ड्रायव्हर एक बटण दाबायचा व गाडी पुढे घ्यायचा. डबा मागेच राहायचा व इंजिन फक्त पुढे सरके. मागील डब्याचे दुमडलेले पाय सरळ होऊन त्यावर डबा उभा राही. लोखंडी चाके कांगारूच्या पायासारखी पुन्हा पुढे लोंबत. मग तो ते इंजिन भरलेल्या डब्याच्या पुढून मागे घ्यायचा. डब्याची लोखंडी चाके व पाय दुमडून इंजिनावर चढायचे. ड्रायव्हर मग तो भरलेला डबा जरा पुढे घेऊन उभा करायचा. पुन्हा रिकामे इंजिन मागच्या रिकाम्या डब्याला जोडून कचर्‍याच्या डब्याच्या ठरलेल्या जागी आणून ठेवायचा. पुन्हा रिकामे इंजिन आणून भरलेल्या डब्याला घेऊन जायचा. इंजिनाच्या धुराचे नळकांडे वरच्या बाजूला असे. मिलच्या चिमणीसारखे. त्यातून काळाशार धूर यायचा आणि प्रचंड आवाज यायचा. हे सगळे पाहायला मुले जमायची. कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला चंदेरी रंग फासलेल्या नक्षीदार खांबावर गॅसचा दिवा होता. काही मोठी मुले खांबावर चढून दिवा लावू शकत. बी ई एस टी चा माणूस टोकाला कडी असलेल्या लांब बांबूच्या काठीने दिवा चालू करी. तो कधी सुटीवर असला तर ही मुले हे काम आवडीने करीत. कचर्‍याची गाडीचे इंजिन कुठलेतरी एकच बटण खेचल्यावर चालू होई.या मुलांना हे ठाऊक होते. ड्रायव्हर कधी विडी ओढायला किंवा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेला की ही मुले अशी संधि न दवडता इंजिन चालू करीत. त्यामुळे मोठ्यांना व्रात्य वाटली तरी आमच्या बालमनाला ही मुले शूर वाटत. आमच्या दादाचा या मुलांत समावेश होताच. शूरपणावरून मी सगळ्यांचे नंबर लावले होते. सगळ्यात शूर भीम आणि अर्जुन. नंतर रामलक्ष्मण. मग हनुमान, जांबुवंत आणि अंगद. त्यानंतर दारासिंग आणि माझा पहिलवान व बॉक्सर मामा. या नंतर मोटार मेकॅनिक. मोटारीखाली झोपून गाडी दुरुस्त करायला काय कमी धैर्य लागते काय? त्याच्यानंतर ही सगळी मुले. पण मोठी माणसे वेडपटच असतात. अगोदर सगळ्यात शूर कोण, नंतर कोण हे सगळे विचारतात. मग सांगितले की उगीच कौतुक करतात्त आणि हसतात.


आता शाळेच्या जागी पोलिस स्टेशन आहे. मारुती मंदिर मात्र अजूनहि तस्सेच आहे. चिंचेचे झाड देखील तसेच आहे. पण आता मारुतीला फक्त बिनवासाची रुईची फुले दिसतात. बालमनातील पहिल्यावहिल्या निरागस विश्वातील स्मृती मात्र तिथून जातांना जिवंत होतात. व्यवहारातील निबरतेचा, स्वार्थाचा, मतलबाचा स्पर्श न झालेल्या स्मृति. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार्‍या स्मृति.

पूर्वप्रकाशन: मनोगत.कॉम दिवाळी २००८: http://www.manogat.com/diwali/2008/node/33.html

No comments:

Post a Comment