तेव्हां मीं एका छोट्याशा कंपनीत प्रशासकीय अधिकारी. तारुण्यसुलभ प्रेमाचे प्रसंग तसे बरेच नाहीं म्हटलें तरी थोडेफार येऊन गेले. कॉलेजांत असतांना कधीं अभ्यासाच्या निमित्तानें. कधीं एखादा कठीण मुद्दा समजावून सांगतांना. पण जास्त करून माझी मुलींकडून अपेक्षा असे ती माझ्या जर्नलमधल्या आकृत्या काढायला. माझी चित्रकारिता एकमेवाद्वितीय आहे. काढूक गेलो गणपति, इलो माकड या दर्जाची. ऐश्वर्याचें पोर्ट्रेट काढलें तर मंथरेसारखें दिसेल. आणि तिचे समस्त पंखे माझ्या नरडीचा घोट घेतील. चित्रकलेची ग्रंथि मला निसर्गानें मुळांतच बसवली नाहीं. त्यामुळें चित्रकुबड्या लावल्याशिवाय शिक्षण अशक्य होतें. असो. कुबड्या कधीं जर्नल लिहायला सुद्धां लागत. त्यामुळें माझ्या जर्नलमधलें हस्ताक्षर नेहमीं बदलतें असे. लिहायची संवय कमीच असल्यामुळें माझ्या स्वतःच्या हस्ताक्षराच्या वाईटपणांतहि विविधता असे. कधीं डाव्या तर कधीं उजव्या बाजूला कललेलें तर कधीं नुसतेंच किरटें. असो. तऽऽर, कधीं अनाहूत स्पर्शामुळें अंगावरून मोरपिसें फिरत तर कधीं फुलबाजा वाजत. सठीसामासीं कधींतरी पार्टी म्हणून तर कधीं पैज जिंकल्यामुळें किंवा हरल्यामुळें एखाद्या पोरीबरोबर मॅटिनी चित्रपटालाहि जात होतों. पण माझ्यावरचे तसेंच सान्निध्यांत आलेल्या त्या मुलींचे संस्कार पक्के होते. दुसरी गोष्ट म्हणजे इतर तथाकथित चटोर पोरी भरपूर खर्च करणार्या असत आणि त्यांच्याबरोबर चैन करण्याएवढा पैसा आमच्या खिशांत खुळखुळत नसे. त्यामुळें त्या तथाकथित चटोर पोरींपासून मीं दूरच. अपर स्टॉलचें तिकीट दीड पावणेदोन रुपये असे. पांचसहा आठवडे रोज दहावीस पैसे बचत केल्यावरच तेवढे पैसे सांठत. त्यामुळें आम्हीं कधींहिं वावगें वागलों नाहीं. आमची घरची परिस्थितीहि यथातथाच. आमचे तीर्थरूप मंत्रालयांत अधिकारी. तेव्हां साठच्या दशकांत सरकारी अधिकार्यांचेंहि वेतन फारसें नव्हते. घरीं मीं धरून सहाजण आणि एक आजी. (आईची मावशी) अशी नऊ जणें. म्हणून शिक्षण पूर्ण होण्याअगोदर प्रेमप्रकरणांची भलती चैन न परवडणारी. त्यामुळें ना मीं कधीं प्रेमाला, अतिनिकट सान्निध्याला वा मोहाला उत्तेजन दिलें ना कधी सान्निध्यांत आलेल्या मुलींनीं.
अखेर नोकरी लागल्यानंतर कां होईना कधींतरी प्रेमांत पडलोंच. साल १९८०. मग आम्हीं कधीं मलबार हिलवरचें हॅंगिंग गार्डन तर कधीं, गेटवे, तर कधीं उपनगरांतला विहार तलाव असे सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सहलीवर जात असूं. रविवारीं किंवा सुटीच्या दिवशीं. एकदां एका मित्रानें माझा असा कार्यक्रम शनिवारचा बोलतांबोलतां हळूंच माझ्याकडून काढून घेतला आणि आम्हांला दोन मित्रांनी पकडलें आणि पार्टी उकळली. त्या मुलीचे तीर्थरूप माजी पोलीस आणि बंधू कोर्टांतील कर्मचारी. त्यामुळें तसें कठीणच होतें. कधींतरी त्यांच्या कोणीतरी नातेवाईकांनीं आम्हांला पाहिलें आणि चित्रपटांतल्याप्रमाणें तिच्या घरीं गडबड झाली. मीं कुठें राहतों, कुठें काम करतों, उत्पन्न किती, आईवडील इ. घरचे काय करतात वगैरे चौकशी केली. यांत नक्कीच कांहीं चुकीचें नव्हतें. पण मीं खांडके बिल्डींगच्या आसपास राहातो आणि मीं आणि माझें मित्रमंडळ, सगळे पक्के वाया गेलेले मवाली आहेत अशी खोटी बातमी तिच्या घरच्यांनीं तिला पुरवली. तेव्हां मैत्री तोडून टाक असा सज्जड दमहि भरला. मुख्य म्हणजे मानसिक छळहि सुरूं केला.
मैत्री तोडायला मला कांहीं फारसें वाटलें नसतें. खरें तर आमचें कुटुंब सज्जन कुटुंब म्हणून परिसरांत ज्ञात होतें. इतरांना ज्ञात कां होतें तर आमचे तीर्थरूप सार्वजनिक गणपतीला व नवरात्राला एक पैसा देखील वर्गणी देत नव्हते. त्रास देण्याचा प्रयत्न केल्यावर आम्हीं सर्व कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करून अपमानित केलें होतें. पण आमच्या घरांत कोणाच्यहि तोंडांत शिवी नाहीं, वाणी अगदीं स्वच्छ, भाषा आणि वागणूक सुसंस्कृत, आजूबाजूचीं कित्त्येक मुलें आमच्या घरीं फुकट शिकवणीला वा कठीण प्रश्न सोडवून घ्यायला येत असत. मुलें माझ्याकडे किंवा धाकट्या बंधूंकडे आणि मुली भगिनींकडे. त्यामुळें आमच्या विरुद्ध इतर तसें कोणीहि नसे. मी मात्र आमच्या दादरच्या विठ्ठलवाडींतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला जात असे. शिवाय घरांतल्या मोलकरणींकडून घरच्या सर्व बातम्या बाहेर कळतातच. त्यामुळें परिसरांतले सर्वजण आम्हांला सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळखत. आत्मश्लाघ्यतेबद्दल क्षमस्व. मुख्य म्हणजे त्या काळीं पंचवीस तीस वर्षांपूर्वीं दादर गिरगांवांत तरी परिसरांतल्या जवळजवळ सगळ्यांची प्रत्येकाला माहिती असे. निदान आमच्या विठ्ठलवाडीतल्या चोक्सी बिल्डिंगभोंवतालच्या सुभद्रा बिल्डिंग, पाटीलवाडी, खांडके बिल्डिंग, बोरकरवाडी इ. परिसरांतल्या बहुतेकांना इतर बहुतेकांची माहिती असे. उदा. एकदां मीं ‘तलवारशेपटीचा लाल मासा’ ऊर्फ ‘रेड स्वोर्डटेल’ जातीचे मासे पाळले होते. त्यांना पिल्लें झालीं हें कळल्यावर कुठून कुठून मुलें त्या पिल्लांसाठीं येत. असो. तर परिसरांत कोणी चौकशी केलीच तर वाईट अहवाल मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. असें असून मीं आणि आमचें कुटुंब मवाली असें म्हटल्यावर त्या वयामुळें असेल माझ्या तळपायाची मस्तकांत गेली. म्हटलें आतां यांना चांगलाच इंगा दाखवायचा. माझ्याबरोबर काम करणारे व नेहमीं बरोबर असणारे माझ्याच वयाचे बाळा कुळकर्णी आणि नार्या तर म्हणाले तिला पळवूनच ने आतां आणि जिरव साल्यांची, ‘वाया गेलेले मवाली’ म्हणतात काय आपल्याला! आमचा पूर्ण सक्रीय पाठिंबा तुला. त्या पोलिसाची पोलिसी आणि कोर्टवाल्याची कोर्टबाजी ठेचून टाकूं. तर असे आम्हीं पेटून निघालों होतों. वाटेल तीं आव्हानें पेलूं शकणार्या त्या वयाची गंमत आहे ती.
असे विचार मनांत असतांना एकदां तिनें सांगितलें कीं आतां घरीं फार मानसिक छळ करतात. घरीं ती व कोर्टबंधू. आईवडील गांवीं कारवारला आणि थोरले विवाहित बंधू वेगळे राहात. म्हटलें बाबांना, मोठ्या बंधूंना सांग. बाबांना सांगायचें धैर्य नव्हते. मोठ्या बंधूंचाहि प्रयोग करून झाला होता आणि त्याची मात्रा चालत नव्हती. माझें वय एकोणतीस, तिचें सव्वीस. दोघेंहि सज्ञान. प्रशासकीय अधिकार्याला कायद्याचें जुजबी ज्ञान वगैरे असावेंच लागतें. प्रथम तिची दुसरीकडून चौकशी केली. वावगें कांहीं आढळलें नाहीं. आई आणि मामी म्हणाल्या कीं सून गरिबाघरची करावी आणि मुलगी श्रीमंत घरांत द्यावी. मग एके दिवशीं घर सोडणार काय तें विचारलें. ती तयार. दिनांक १०-०१-१९८१. बहुधा शनिवार होता. तेव्हां साडेदहा वगैरे वाजले असावेत. म्हटलें आत्तां निघणार? पूर्वसूचना देणें मूर्खपणाचें होऊं शकलें असतें. कारण बंधू कोर्टांत. चोरीचे, खुनाचे वगैरे खोटे खटले माझ्यामागें लावायचा. आत्तां ताबडतोब येतेस तर बॅग भरून चल नाहीतर विसर. फक्त तासभर वाट पाहीन. शीघ्र निर्णय घेण्यांत माझें मराऽऽऽठी पाऊल पडतें पुढेंच. ताबडतोब टॅक्सी केली, घर येण्यापूर्वीं दोनतीनशें मीटर तिला उतरवलें आणि मीं पुढें जाऊन यू टर्न घेऊन सरळ तिच्या घरासमोर टॅक्सी उभी केली. अर्ध्या तासानें बॅग घेऊन ही बया आली.
तडक टॅक्सी दादर स्टेशनवर घेतली. वसईची तिकीटें काढलीं. एका बालमित्राकडे गेलों. शंभरसव्वाशें वर्षांपूर्वींचें जुन्याच पद्धतीचें पण प्रशस्त कौलारू घर. त्याची आई - तिला सगळे ताई म्हणतात, तेव्हां नुकतीच मुंबई महापालिकेमधून सेवानिवृत्त झालेली. घरांत तो मित्र शेखर - हा एस टी त कामाला, ताई आणि ताईची आई बाईआत्या. एक आश्रित दहावीचा विद्यार्थीहि घरांत राहायला होता. सुदैवानें सगळे घरांतच होते. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. प्रेमळ पण कडक, रोखठोक स्वभावाच्या ताईंनीं अट घातली. दोन आठवड्यांत लग्न करायचें नाहींतर तिला तिच्या आईबाबांच्याकडे कारवारला ताई स्वतः पोहोंचविणार. तोपर्यंत ती ताईच्याच कस्टडीमध्यें राहील. आणि मीं आणि शेखर दोघांनीं बाहेर ओटीवर झोंपायचें.
दुसरे दिवशीं मीं नेहमीप्रमाणें कामावर गेलों. तिच्या घरच्यांनीं माझ्याकडे दूरध्वनीवरून चौकशी केली. मी शांतपणें बोललों आणि ताकास तूर लागूं दिली नाहीं. मीं रोज वसईहून अंधेरीला कामावर जात होतों. तिथून दादरला घरीं. जेवूनखाऊन सातसाडेसातला निघून नऊसाडेनऊला वसई. वसईची मस्त ताजी हवा, त्यातून थंडीचा जानेवारी महिना. प्रवासानंतर अशी मस्त भूक लागे कीं वसईला गेल्यावर पुन्हां ताईंचा आग्रह मोडत नव्हतों. रात्रीं साडेअकराबारापर्यंत गप्पाटप्पा आणि लहानपणच्या आठवणी, नकला वगैरे. ताई मस्त नकला करतात. लोकल ट्रेनमधल्या बायकांच्या नमुन्यांच्या, भाबड्या गडीमाणसांच्या मस्त नकला करून दाखवत. तेव्हां ऐंशी पार केलेल्या बाईआत्याहि मजेंत आयुष्य जगणार्या. ताईंकडे त्यांच्या तीर्थरूपांची एक जुनी कोटटोपी होती. आणि एक जाड कांचांचा एका कांचेला तडा गेलेला त्यांचाच पुरुषी चष्मा. एकदा हिला त्या घरांत कुठेंतरी पेन्शनर चालतांना घेतात तशी मस्त काठी मिळाली. हिनें माझी पॅंटशर्ट घातली, वर तो कोट घातला, तो चष्मा चढवला, टोपी घातली आणि थरथरत वांकून चालत जाऊन बाईआत्यांपुढें उभी राहिली. आवाज बदलून थरथरत्या स्वरांत विचारलें "मला ओळखलेंस कां?" बाईआत्या बोळकें पसरून मनसोक्त हसल्या आणि बोलल्या ओळखलंऽऽ ग बाईऽऽ, ओळखलंऽऽ! अंधुक नजरेच्या, जवळजवळ बहिर्या बाईआत्यांनीं फक्त तीनचार दिवसांच्या ओळखीनंतर तिला कसें ओळखलें हें एक आश्चर्यच आहे. आठवडा हास्यविनोदांत कसा गेला कळलेंहि नाहीं. तो दहावीचा मुलगा गणेशहि लाघवी होता. तिला ताई ताई करून झाडावरून पेरू, फुलें काढून देत असे. दुकानावरून एखादी वस्तू आणून देत असे. परिस्थितीचे ताणतणाव होतेच. पण अशा प्रसंगामुळें कांहीं वाटलें नाहीं. ऑफिसमधून मीं व्यूहरचना करीत होतोंच.
दादरच्या रानडे रोड टपाल कचेरीच्या बाजूला ‘आदर्श विवाह मंडळ, येथें वैदिक पध्दतीनें विवाह लावून दिले जातात’ अशी पाटी होती. केली चौकशी. दुसर्या मजल्यावरच्या घरांतलाच दिवाणखाना. रानडे रोडला लागून असलेल्या गॅलरीला लागून असलेली प्रशस्त किंवा ऐसपैस म्हणतां येणार नाहीं, पण अगदीं लहानहि म्हणतां येणार नाहीं एवढी खोली. गॅलरीला लागून असलेली एक फ्रेंच विंडो म्हणजे गज वगैरे नसलेली खिडकी. त्या काळीं फ्रान्समध्यें त्या काळीं चोर वगैरे नसावेत. म्हणूनच त्यांना खिडक्यांना गज वगैरे ठेवायची गरज वाटली नसावी. असो. किती माणसें येऊं शकतील असें विचारलें. वीसपंचवीस म्हणाले. पण मुख्य सूचना होती कीं आतां पौष महिना आहे. पारंपारिक मताचे कोणीहि लग्नकार्यें वा जागेचे व्यवहार पौषांत करीत नाहींत. आम्हीं तुम्हांला अंधारांत ठेवूं इच्छित नाहीं. लग्न झाल्याचें प्रमाणपत्रहि ज्या तारखेस लग्न लागेल त्याच तारखेंचें म्हणजे पौषातलें असेल तर पौषांतलेंच मिळेल. पुढें कांहींहि बरेंवाईट घडलें तर आम्हांला दोष देऊं नका. माझा मुहूर्तापेक्षां मनगटांतल्या पाण्यावरच विश्वास. किंबहुना किशोर ताम्हाणेच्या दंडातल्या बेडक्या त्याच्या मनगटांतल्या पाण्यावरच जगतात असें आमच्या कंपूतल्या जाड्याचें मत आहे. असो. या विवाह मंडळाचा चालक श्री. अमुक अमुक आमच्याच कॉलेजातला. कुठल्या वर्षाला होता कोण जाणे. पण जाड्या त्याला ओळखत होता. दिवसां रुपारेलच्या आणि संध्याकाळीं शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसणारा जाड्या तसा शेकडों मुलांमुलींना ओळखत असे. रुपारेलच्या कट्ट्याला चिकटलेल्या जाड्याला बहुतेक मुलें मुली ओळखत.
ताई आणि शेखर, माझी आई, मोठे बंधु (तेव्हां अविवाहित), धाकटे बंधू, दोन भगिनी, मामी, मावशी, मामेबहीण रतनची शाळकरी मुलगी बुबी, आमच्या कंपनीच्या डायरेक्टरबाई, मुलीचे पालक म्हणून कन्यादान करायला शेजारचें परुळेकर जोडपें व त्यांचें शाळकरी कन्यारत्न ऋता, श्री व सौ बाळा कुळकर्णी (हा माझा ल्ग्नांतला माझ्याच वयाचा पालक), त्यांची तीनेक वर्षांची मुलगी बब्बड झब्बड, जाड्या, किशोर ताम्हाणे, आमच्याच कंपनीतले डॉ. व सौ. प्रकाश सुखटणकर, श्री. व सौ. केसकर + कन्यारत्न आणि नार्या, बाळ्या नाईक, पेंडसे आणि भोईटे, एवढा कोरम जमला. पोलीसबिलीस आल्यास शोभा नको म्हणून जेवायला कोणीहि थांबणार नव्हतें त्यामुळें केवळ अल्पोपहाराचा बेत ठरला.
तासाभरांत लग्न सुफळ संपूर्ण झालें. एक गंमत म्हणजे तेव्हां ‘लव्ह स्टोरी’ नांवाचा नवीन हिंदी चित्रपट लागला होता. कुमार गौरवचा. पण त्यातलीं सगळीं गाणीं नंतर हिट झालीं होतीं. आमच्या लग्नांत त्याच गाण्यांची नुकतीच बाजारांत आलेली नवी कोरी कॅसेट लावली होती. तेव्हां सिड्या नव्हत्या. सर्वांनीं तीं गाणीं प्रथमच ऐकलीं होतीं. त्या गाण्यांनीं मस्त माहोल बनवला होता. मामी, मावशी आणि बुबी घरीं गेल्या. घरीं जाऊं नको, तुझे तीर्थरूप असले तर काय होईल सांगतां येत नाहीं, उगीच सुरुवातीलाच कटकट नको तेव्हां अगोदर आमच्याकडेच ये आणि जेवायलाच ये म्हणून मामीनें सांगितलें. गेलों.
तळमजल्यावरच्या तसेंच पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत कौतुक करायला मंडळी दाटीवाटीनें उभी होती. तळमजल्यावर मामी, हेमंत, वहिनी, रतन, विजय (श्रीयुत रतन), बुबी आणि गार्गी (रतनच्या किशोरवयीन मुली), कामवाल्या मुली, पहिल्या मजल्यावर नाना, मावशी, बाळादादा, वहिनी, बाळादादाचे अमोल आणि सुशील, विदू, वहिनी, मुली, वगैरे वगैरे. अरुणाताई मात्र पुण्यांत असते. तिला ठाऊकच नसल्यामुळें ती नव्हती. असतें तर आलीच असती. हेमाला ठाऊक नव्हतें नहींतर तीहि आलीच असती. स्वातंत्र्यदिनाचें संचालन पाहायला जमतात तसें. इथें माझें स्वातंत्र्य धोक्यांत आलें होतें याची मला तरी कुठें जाणीव होती? आम्हीं गॅलरीतून कौतुकाचा सुहास्यवदनानें मान डोलावीत स्वीकार करीत आनंदांत जवळजवळ तरंगतच पुढें गेलों तसें सगळे आंत गेले. रतननें दरवाजा उघडला. मामीनें वहिनीकडे पाहिलें वहिनी आंत गेली. आतां फक्त मामी आणि रतनच्या मध्यें आंत जायला जागा होती. व्हरांड्यांत प्रथम बूट, मोजे काढले. तिथून अंग चोरून मीं आंत जाणार तोंच रतन बाजूला सरकली आणि मला अडवलें. मग मी उजवीकडच्या बाजूनें आंत जायला सरकलों.
रतन पुन्हां सरकून वाटेंत आडवी आली. खेंकसली, "आहेस तिथेंच उभा राहा गपचूप!"
माझा चेहरा खर्रकन उतरला. चेहर्यावर केविलणवाणें प्रश्नचिन्ह. मी मामीकडे पाहिलें मामीच्या ओळ्यांत अपार स्नेह, जिव्हाळा अणि कौतुक. मी पुन्हां दोघींच्या मधून जाण्याचा प्रयत्नांत.
"आंत पाऊल ठेवशील तर खबरदार! गऽऽप उभा राहिला नाहींस तर कानफटात वाजवीन!" रतन.
एवढा अपमान? केवळ वेगळ्या जातींतल्या मुलीशीं लग्न केलें म्हणून? क्षणांतच माझ्या मनांत अंधार दाटून आला. मागें वळून सौ.च्या चेहर्याकडे बघण्याचें धैर्य माझ्यांत नव्हतें. मीं निराश, विमनस्क होऊन परत जायला मागें वळणार तोंच आंतून वहिनी आली. डोळ्यांत कौतुक, चेहर्यावर स्मित. हातांत चांदीचा गडू आणि भाकरीचा तुकडा. तिच्या मागेंमागें शाळकरी, किशोरवयीन बुबी तिच्या वयाला शोभेशा उत्साहानें, आनंदानें घोटाळत होती. तिच्या हातांत पण कांहींतरी. इतरांचा घोळका बुबीमागें. वहिनीनें इशारा करून नवपरिणित वधूला पुढें बोलावलें.
"दोघं नीट बाजूबाजूला उभे राहा रे मूर्खा!" रतनबाईंची प्रेमळ सूचना. माझ्या मनांतले निराश भाव ओळखून रतनला उकळ्या फुटत होत्या आणि ती हसू दाबतच मागें झाली.
आत्ता माझ्या डोक्यांत प्रकाश पडला. कांहींतरी सोहळा दिसत होता. रतनच्या सौजन्याबद्दल गैरसमज करून घेतल्याची माझी मलाच लाज वाटली. मग वहिनीनें भाकरतुकडा आमच्याभोंवती ओवाळून बाहेर टाकला. मग गडूतलें दूध ओवाळून टाकलें. बुबीच्या हातांत निरांजन लावलेलें ताट होतें. निरांजनाबाजूला हळदीकुंकवाचें साहित्य. मग औक्षण केलें. बुबीनें उंबर्यावर माप ठेवलें. तो सोपस्कार आटोपून आंत येऊन मामी, रतन, विजय (श्रीयुत रतन) हेमंत, वहिनी, आणि इतर मोठ्यांस जोड्यानें नमस्कार केला आणि मगच घरांत गेलो. वहिनीनें आपुलकीनें केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल मीं तिचा कायम ऋणी आहे. तरी नंतर मीं आचरटासारखें सौ.च्या कानांत विचारलें कीं मामी असतांना वहिनीनें कां ओवाळलें म्हणून. मामा स्वर्गवासी झालेला असतांना ती कशी ओवाळेल म्हणून माझी मूर्खांत गणना झाली. केवळ पती स्वर्गवासी झाला म्हणून त्या पूज्य महिलेचा मान हिरावणारी ही औक्षणाची प्रथाच बुडवायला पाहिजे किंवा तो मान त्या माऊलीला द्यायला तरी पाहिजे असें माझें अजूनहि ठाम (कांहीबाही?) मत आहे. राजा राम मोहन रॉयसारखा कोणीतरी पुन्हां जन्मायला पाहिजे. माझें मुलांच्या शाळेंत वाढलेलें बजरंग छाप भावविश्व मात्र तसेंच किशोरावस्थेंत घोटाळत होतें. अजूनहि तसेंच आहे. त्यातून माझ्या धर्मभंजक वृत्तीमुळें जरी तशीं मीं अनेक लग्नें पाहिलीं असलीं तरी लग्नानंतरचे विधी कुठून माहीत असणार? त्यामुळें मीं हणगोबा सरळ घरांत घुसणार होतों. मला लहानपणापसून पाहाणारी रतन तें ओळखूनच तिथें पाहार्याला उभी होती.
शिवाजी पार्क कट्टा टाईम्सची एक शिळी बातमी - आपल्यांतला एक मित्र एक बळी गेला याचें दुःख आणि पोलिसाची व कोर्टवाल्याची खोड मोडल्याचा आनंद साजरा करायला करायला आमच्या कंपूतले एक नक्षत्र नारकर ऊर्फ नार्या ऊर्फ शेटजी संध्याकाळीं त्या दिवशीं एकटाच संध्याकाळीं एका बारमध्यें गेला होता. त्याचा आणि बाळा कुळकर्णीचा तसेंच इतर मित्रांचा पाठिंबा माझ्यासाठीं परतफेड करतां न येण्यासारखा अमूल्यच होता. त्याच्या समोर एक मुलगा येऊन बसला. त्याला कोठेंतरी पाहिलें आहे असें त्याला वाटलें. पण कोठें तें आठवेना. थोडेसें मद्य पोटांत गेल्यावर त्याला आठवलें. तो आमचें लग्न लावणारा भटजी होता. भटजींचा पेहराव उतरून पाश्चात्य वेषभूषा केल्यामुळें तो चटकन त्याला ओळखूं शकला नाहीं. पण मग नार्यानें ओळख दिली आणि त्या दोघांची त्या दिवसापुरती कां होईना पण मस्त मैफल जमली.
तर अशा एवम् गुणसंपन्न भटजींनीं आमचें लग्न लावल्यामुळें पौषात देखील लग्न होऊन अजूनहि आमचा घटस्फोट वगैरे झालेला नाहीं असें आर्य मदिरा मंडळाच्या सन्माननीय सदस्यांचें मत आहे. तारीख पण बघा. इंग्रजींत लिहिली तर डावीकडून उजवीकडे वा उजवीकडून डावीकडे, खालीं डोकें वर पाय - उलट वा सुलट नाहींतर आरशातून, कशीहि वाचा. I8-I-8I म्हणजे I8-I-8I. हें बाळ्या नाईकच्या लक्षांत आलें. अशा तर्हेनें आमच्या प्रेमाचा तसेंच सड्याफटिंग स्वच्छंदी आयुष्याचा सुखद अंत (सुखद वाटोळें?) झाला. पण मन आणि भावविश्व? त्या बजरंग युगांत घुटमळणार्या भावविश्वामुळें कायकाय गंमतीजंमती झाल्या त्या नंतर पुढें कधींतरी.
पूर्वप्रसिद्धी: डिसें. २००९: hivaliank.blogspot.com