Tuesday, 2 March 2010

मुंबईचे दिवस ६ आठवणींचे कवडसे

कांहीं दिवसांपूर्वीं रेलवेनें दादरला जात होतो. दुपारीं साडेतीनचा सुमार. सौ स्त्रियांच्या डब्यात गेली. रविवार असल्यामुळें डब्यात शुकशुकाट. मालाडला गाडीत बसलों. डब्याच्या दोन्हीं बाजूंना हिरवे डेकोरेटिव्ह लॅमिनेट ऊर्फ सनमायका. त्याच्याशीं काटकोनांत असलेल्या लोखंडी पार्टिशनवर हिरव्या एनॅमलची पुटे चढवलेली. हिरव्या रेक्झीनची आसनें. खिडकींत ऊन असल्यामुळें मीं खिडकीपासून दूर, कडेच्या तिसर्‍या आसनावर बसलों. गोरेगांवला बाजूला एक नवपरिणित जोडपें येऊन बसलें. माझ्या बाजुला पुरूष आणि त्यापलीकडे खिडकींत स्त्री. पुरुषानें फवारलेल्या ‘ब्लू फॉर मेन’ मधूनहि स्त्रीनें लावलेल्या ‘टॉमी गर्ल’ दरवळत होतें. स्टेशन सोडलें तसे पश्चिमेकडे कललेल्या सूर्याची किरणे खिडकीतून आंत आलीं. आणि समोरच्या सीटमागील हिरव्या रंगाच्या पार्टिशनवर विविध रंगांचे टिकलीएवढे असंख्य कवडसे नाचूं लागले. गाडीच्या डब्याचा अचानक कायापालट झाला. आतां मीं पाचूच्या महालांत होतों.  त्या स्त्रीने बहुधा गळ्यांत रत्नहार घातला असावा. रंगीत कवडशांचा तो विभ्रम मला भूतकाळांत घेऊन गेला. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीं. मी असाच कधींतरी रविवारचा आईला भेटायला भाईंदरहून रेलवेनें दादरला जात असे. दुडदुडणारा वर्षासव्वावर्षाचा टिंगू माझ्यासोबत आणि सौ. स्त्रियांच्या डब्यात. दुडदुडणार्‍या बालकाला इंग्रजीत टॉड्ड्लर असा मस्त शब्द आहे. तोहि आठवला. तेव्हा पण अशीच प्रकाशाची रांगोळी पार्टिशनवर पडली होती आणि टिंगू समोरच्या त्या रिकाम्या तीन सीटवर इकडे तिकडे पळत उड्या मारत ते कवडसे पकडण्याचा प्रयत्न करीत होता. अख्खा डबा त्याची गंमत पाहात होता. त्यातच काहीतरी कारणानें पंधरा वीस मिनिटे गाडी एका जागी खोळंबून उभी होती. थोड्या वेळानें उन्हाची दिशा बदलल्यावर कवडसे गेले. मग दुसरा खेळ.  तर्जनी, मधलें बोट आणि अंगठा जुळवून मीं हरणाचें तोंड केलें. उरलेलीं दोन बोटें हरणाचे कान. टिंगूनें पण तसेंच केलें. मग माझें हरिण त्याच्या हरणाचा चावा घ्यायचा प्रयत्न करायला लागे. त्याचें हरिण निसटे. निसटलें कीं तो खुदखुदे. मग त्याच्याबरोबर इतर प्रवासीहि खुदखुदायला लागले. चावा घेतला कीं तो आऊट. मग माझें हरिण पळणार व त्याचें चावा घेणार. खेळ मस्त रंगला. डब्यातल्या प्रवाशांची मस्त करमणूक. अर्धापाऊण तास कसा गेला कळलेंहि नाहीं.


कांहीं वर्षें आम्हीं भाईदरला राहायला होतों. (नंतर मालाडला गेलों) विरार लोकलला वेळ असला तर बोरिवलीपर्यंत जाऊन नंतर विरार लोकल पकडत असूं. एकदां असेंच रिकाम्या बोरिवली लोकलनें मी आणि दीडदोन वर्षांचा चिरंजीव असे दोघें दादरहून बोरिवलीला आलों. व फलाट क्र. ४ वर विरार लोकलची वाट पाहायला लागलों. हा माझ्या कडेवर. कांहीं मिनिटांनीं इतर रेलवे गाड्या पाहून झाल्यावर त्याच्या दृष्टीला माझ्या मागचा स्टॉल पडला. तिथल्या पेपरमिंटच्या गोळ्या त्याला दिसला. गोळी पाहिजे म्हणून त्यानें मागणी केली. तेवढ्यांत गाडी आली. चपळाईनें गाडीत चढून खिडकीत जागा पकडून बसलों. तोपयंत यानें गोळी पाहिजे म्हणून हट्ट करून मला बोचकारून केस ओढून माझा अवतार करून ठेवला. गाडी सुटतांना एक सरदारजी घुसला. कोणाला तरी शोधत होता, मग आमच्या समोरच्या सीटवर येऊन बसला. मराठींत म्हणाला, ‘बेटा, गोली जास्त खाऊं नको, नाहीतर उंदीर तुझे दात खाणार.’ त्याच्या दाढीमिशा पाहून टिंगू म्हणाला तो बुवा आहे, त्याला तूं मार. तो अति लौकर चुरुचुरु बोलायला लागला होता. मी म्हटलें तो चांगला बुवा आहे त्याला नमस्ते कर. तेवढ्यांत त्या सरदारजीनें मूठ उघडून गोळ्यांची पुडी समोर धरली. कोण कुठला सरदारजी, ना ओळख ना पाळख, पण फलाटावर दिसलेल्या अनोळखी छोट्याचा हट्ट पुरवायला गोळ्या घेऊन आला व कशीबशी धडपडत गाडी पकडून आम्हांला डबाभर शोधत समोर येऊन बसला. मुंबईचे हें अपरिचितांबद्दलहि दिसणारें सौजन्य, हें अगत्य, इतरत्र क्वचितच आढळेल. या बाबतींत मुंबई नक्कीच श्रीमंत आहे.


या सौजन्यावरून आठवलें. एकदां आमच्या संगणकाचा मॉनिटर बिघडला. डेवू मेकचा विचित्र नग होता. तेव्हां डेवू कंपनी बंद देखील पडली होती. दोघांतिघांनीं डोकें आपटलें होतें व दुरुस्त नव्हते करूं शकले. संजय टंकारिया नांवाचा एक गुजरती गृहस्थ दुरुस्त करूं शकेल असें कळलें. बोरिवलीलाच राहात होता. त्याला दूरध्वनि लावला. त्यानें लक्षणें विचारलीं व कोठें राहातां म्हणून विचारलें. आमच्या मालाडच्या घरापासून जेमतेम पांच किलोमीटर. तो म्हणाला, घरीं घेऊन याल तर बरें होईल. कितीहि गुंतागुंत असली तरी दुरुस्त होईल. एक आठवड्यांत देईन. म्हटलें बरें झालें. आदळला एकदाचा त्याच्या घरीं नेऊन. चार दिवसांनीं त्याचाच दूरध्वनि आला. दुरुस्त करून तयार आहे. घेऊन जा. दुरुस्तीची मजुरी रु. तीनशें फक्त. गेलों त्याच्या घरीं. निघतां निघतां पावसाची एक सर आली. म्हणाला काका बैठो. बारीश जाने दो. चायबाय पिओ हमारे साथ, बादमें जाओ. त्यानें मॉनिटर चालवून दाखवला. त्याचे सत्तरएक वयाचे वडील पण घरी होते. मराठी आणि गुजराती मिश्रित हिंदीतल्या गप्पा मस्त रंगल्या. चहा खाणें झाले. मॉनिटर त्यानेंच पॅक केला. थांबा म्हणाला. आपण कपडे चढवले. मीं मॉनिटर उचलायला लागलों तर त्यानें उचलूं दिला नाहीं. आपणच उचलला, दोन मजले उतरून खालीं रस्त्यावर आला, रस्ता पार करून रिक्षा ठरवली, रिक्षांत मॉनिटर ठेवला आणि अब बैठिये काका अशी कमरेंत झुकून विनंति केली. ती आठवण आली कीं मीं अजूनहि भारावून जातों. एका अनोळखी गुजराती माणसाचें हें सौजन्य.


मुंबईची माणसें तशी अगत्यशीलच. आणखी एक नमुना पाहा. साल सुमारें २००५ असावें. आमचे एक्साईज कन्सल्टंट श्री. बी. एच. जोशी. सेवानिवृत्त सहायक समाहर्ता ऊर्फ असिस्टंट कमिशनर. दूरध्वनी केला कीं तत्परतेनें उपस्थित होतात. तेव्हां महानगर टेलिफोन निगमच्या कृपेनें त्यांचा दूरध्वनी बरेच दिवस बंद होता. जुन्या काळांतले जोशीबुवा भ्रमणध्वनि अर्थात मोबाईल वापरत नसत. मग काय पत्ता घेतला आणि त्यांच्या घरीं निघालों. XXX इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व. कांदिवली स्थानकाला लगूनच लेव्हल क्रॉसिंगकडून पूर्वेला निघणारा रस्ता हा आकुर्ली रोड. पुलावरून आकुर्ली रोडला आलों. एक दुधाची डेअरी कम हॉटेल कम फरसाण दुकान लागलें. गल्ल्यावरच्या गृहस्थांना विचारलें कीं ती इमारत कुठें आहे. तो सदगृहस्थ गल्ल्यावरून बाहेर रस्त्यावर आला. त्याच्यामागोमाग मीं. त्यानें बोट दाखवलें. सिग्नल के पास वो राईट हॅंड कॉर्नर की चार माले की पिंक कलरकी बिल्डिंग दिखती है ना, वो रही आपकी बिल्डिंग. हें तो खरें म्हणजे गल्ल्यावरूनच सांगूं शकला असता. पण त्याची आपुलकीची भावना मोठी होती. ना ओळख ना पाळख, पण त्याच्या कळकट कपड्यांआडचें हें सौजन्य मुंबईत ठायीं ठायीं दिसतें. फक्त आपण नम्रपणें, हंसतमुखानें विचारलें पाहिजे. मार्केट इलाखा गुजरात्यांनींच व्यापलेला आहे. एखादी विशिष्ट वस्तू घ्यायची असेल आणि कुठें मिळतें हें ठाऊक नसेल. खासकरून एखादा मशीनचा विचित्र भाग, तर तो भाग घेऊन मुंबई मार्केटमध्यें एखाद्या गुजराथ्याच्या दुकानांत जावें. त्याला कळलें नाहीं वा ठाऊक नसेल तर तो सतरा जणांना बोलावून विचारेल, कोठें मिळतो तें समजून घेईल व बरोबर पत्ता सांगेल, त्या दुकानांत कसें जायचें तेंहि सांगेल आणि कदाचित दूरध्वनी क्रमांक देखील देईल. मग भले ती व्स्तू छोटीशी पांचसहा रुपयांची का असेना. उगीच नाहीं ऊठसूठ प्रत्येकजण मुंबईला धावत.


आतां वेगळी गम्मत. टिंगूला शाळेला मोठी सुट्टी पडली कीं आम्हीं मुंबईभर फिरत असूं. आज इथें तर उद्यां तिथें. तेव्हां पूर्व प्राथमिक शाळेंत - प्री-प्रायमरींत होता. तेव्हां असेच मत्स्यालय पाहून क्रीम सेंटरमध्यें ट्रिपल संडे आईसक्रीम खाल्लें आणि मलबार हिलवरच्या हॅंगिंग गार्डन मध्यें गेलों. तिथें झाडांना विविध प्राण्यांचे आकार दिलेले आहेत आणि आवाज घुमणारे सज्जे आहेत. तिथें फूटपाथवरून जातांजातांच एक माकडवाला समोरून आला. दोन मस्त रंगीबेरंगी कपडे घातलेलीं माकडें. टिंगू थांबला. माकडवाला देखील थांबला. बेटा इसका नाम धर्मेंद्र और उसका हेमा मालिनी. धर्मेंद्रनें रुबाबदार पुरुषाचे कपडे घातले होते तर हेमानें स्त्रीचे. कपडे पण मस्तच होते. जंप मारके दिखाओ. दोन्हीं माकडांनीं कोलांट्या मारल्या. टिंगू खूश. बाबा को शेकहॅंड दो. धर्मेंद्र हेमा दोघांनीहि शेकहॅंड दिला. बाबा के मम्मी को शेकहॅंड दो. दिला. बाबा के पप्पा को शेकहॅंड दो. मला मांजर सोडून सर्वच प्राण्यांची भिती वाटते. तरी तसें न दाखवतां शेकहॅंड दिला. आश्चर्य़ाचा जोरदार धक्का बसला. माकडांचे तळहात अगदीं तान्ह्या बाळाइतके मऊ होते. अगोदर कळलें असतें तर माकडिणीशींच लग्न केलें असतें. नंतर धर्मेंद्र, हेमा आणि माकडवाला असे तिघांनाहि टिंगूनें पैसे द्यायला लावले.


आतां माकडावरून आठवलें. जुना किस्सा. तेव्हां मीं जेमतेम वीसेक वर्षांचा होतो. म्हणजे साल १९७१-७२ वगैरे असावें. मुंबईहुन माथेरान लोकलगाडीनें जवळ वाटतें. बर्‍याच वेळां जात असूं. या वेळीं मी आणि माझा एकच समवयस्क मित्र - ताम्हणकर असे दोघेच.  आम्हीं जातांना येतांना नेरळवरून पायीं जात असूं. नेरळहून चढतांना कडक ऊन लागतें. तहान फार लागते. तहान भागवायला आम्हीं काकड्या व गाजरें नेत असूं. तेव्हां बाटलीबंद पाणी नसे. वाटेंत थांबलों. दगडावर बसून काकडीचा समाचार घेत होतों. मागून एक साताठ पोरींचा कळप आला व ‘भारत के नौजवान थक गये’ अशी मल्लिनाथी करून पुढें गेला. माथेरानला माकडांचा फार उपद्रव. नंतर माथेरानच्या बाजारांतून फिरतांना समोरून एक घोडा भरधाव पळत आला. त्याच्याबरोबरचा माणूस नव्हता. घोड्यावर एक भयभीत तरुणी किंचाळत असलेली. तिच्या एका हातांत उकडलेल्या शेंगांची पुडी आणि दुसर्‍या हातांत केक वा पेस्ट्री. मला मांजर वगळतां सर्वच प्राण्यांची भिती वाटते हें अगोदर आलेलें आहेच. मी घोड्याच्या मार्गातून बाजूला झालों. पण माझा मित्र ताम्हणकर, त्यानें घोड्याचा लगाम पकडून त्याला थांबवलें. घोडा ताम्हणकरनें झाडाखालीं नेऊन थांबवला. मला सांगायला लागला कीं तो घोडा बिथरलेला नव्हताच. त्या तरुणीच्या टाचा घोड्याला लागत होत्या व त्याला पळायचा इशारा मिळत होता. म्हणून घोडा पळत होता. मागून घोड्याबरोबरचा मुलगा आला. त्या मुलीनें सुस्कारा सोडला. तेवढ्यांत झाडावरून एक माकड आलें, तिच्या खांद्यावर क्षणार्ध बसलें आणि तिच्या हातांतला सगळा खाऊ घेऊन झाडावर पळून गेलें. ती मुलगी घाबरलेली होतीच. एवढी मोठी मुलगी आतां रडायलाच लागली. नंतर त्यांतहि आपण भर बाजारांत मूर्खासारखें लहान मुलीप्रमाणें रडतो आहोंत हें समजून तिला हसायला पण आलें. आजूबाजूच्या दुकानांतून चारपांच माणसांचे तिच्याकडे लक्ष गेलें होतेंच. रस्त्यावरील माझ्यासारखे आठदहा बघे होतेच. सर्वांची मस्त करमणूक झाली. मागून आणखी पांचसहा घोडे आले. सगळ्यांवर मुली. ती मुलगी ‘भारतके नौजवान’ मधली होती. मग मी फुशारकी मारली. भारतके नौजवान शूर होते हैं म्हणून.


खरें तर बरीवाईट माणसें सगळीकडेच असतात. आपण काय टिपावें तें आपल्या वृत्तीवर असतें. चांगलें उचलावें जमलें तर जतन करावें, त्याज्य असेल तें टाकावें हेंच खरें.

पूर्वप्रकाशन: मनोगत.कॉम:३१-०७-२००९.

No comments:

Post a Comment