Thursday, 4 March 2010

मुंबईचे दिवस ८ : मकरसंक्रांत आणि कांहीं प्रसन्न आठवणी

मकरसंक्रांतीच्या निमित्तानें कांहीं आठवणी जाग्या झाल्या. मुंबईत संक्रांतीच्या दिवशीं चंद्रकळांचा सुळसुळाट असतो. काळ्या साडीवरच्या विविध मनोहारी नक्षीकामाचें संमेलनच बसीं, रस्तीं फलाटीं भरलेलें असतें. नुसत्या तोंडओळखीवर देखील बस थांब्यावरची एखादी महिला आपल्या हातावर तिळगूळ ठेवून तिळगूळ घ्या गोडगोड बोला म्हणून निघून जाते. मग ती कुठल्या ओळखीची याचा डोक्याला ताप करून न घेतां मीं तिळगुळाचा लाडू गट्ट करीत असे. पण सर्वांत चवदार लाडू योगिताच्या वा स्वातीच्या खणांतून ती जागेवर नाहीं असें पाहून सर्वांसमोर चोरून खाल्लेला. किंबहूना ती जागेवर नसल्याची बातमीच मला खास लाडू चोरण्यासाठीं कुणीतरी देत असे. मग मोजलेले लाडू कमी भरल्यावर ती भलत्यावरच संशय घेऊन त्याच्या नांवानें ठणाणा करे. मग मस्त हशा पिके. एक ख्रिस्ती संचालक न चुकतां ‘मि. सुधीर व्हेअर इस तिलगूल ऍंड पुरन पोली फ्रॉम यू?’ हा प्रश्न विचारतात आणि मग सगळ्या महिला टुडे इट इज तिलगूल डे ऍंड पुरन पोली इज ऑन होली डे’ म्हणून त्यांना माहिती पुरवत. मग राशिनकरांच्या डब्यांतली धृतस्नेहांकित पुरणपोळी ते मिटक्या मारीत खात.


काळ्या चंद्रकळेवरून आठवलें. संक्रातीला काळी चंद्रकळा तर नवरात्र रंगीबेरंगी. मराठी वृत्तपत्रांत कांहीं दिवस अगोदरच नवरात्रांतल्या प्रत्येक दिवसाचा विशेष रंग जाहीर होतो. उद्यां अमुक रंगाचा शर्ट घालून या असा गोड आग्रह कार्यालयांतला महिलावर्ग समस्त पुरुष सहकार्‍यांना करीत. दुसरे दिवशीं समस्त महिलावर्ग त्या रंगाचा पोषाख धारण करतो. मग मालाडच्या खाजगी मिनीबसमध्यें, रेलवेच्या फलाटावर, महिलांच्या डब्यांत, बस थांब्यांवर, सर्व महिलांच्या अंगावर एकाच रंगाचा पोषाख, तरीहि त्यांत विविध छटा आणि विविध तर्‍हा आढळतात. यांतील अंधश्रद्धेचा भाग सोडला तर एकंदरींत नऊ दिवस नऊ रंग. सगळीकडे झगमगीत, उत्साहाचें आणि आनंदी वातावरण असतें. समाज (यांत मीहि आलों) उत्सवप्रिय आहे हेंच खरें. कांहीहि असो उत्सव प्रसन्नता, आनंद आणि जीवनाची नवी ऊर्मी देतात हेंहि खरेंच.
  
पण एखाद दिवस कसा मस्त प्रसन्न उजाडतो. सणबिण कांहीं नसतो. हवा मस्त असते, बस, ट्रेन वेळेवर येते, ट्रेनमध्यें सहज शिरतां येतें, एकदोन विनोद होता, बसमध्यें मनासारखी जागा मिळते, कचेरींत पण मनासारखें काम होतें आणि कांहींहि त्रास न होता छान मजेंत दिवस जातो. अशाच एका दिवसाची कथा.


बसच्या रंगेत तिकीट देणारा वाहक - कंडक्टर रामदास आज शंभर सुटे देतां देतां बराच वेळ बोलत होता. हा तरूण वाहक नेहमीं हसतमुख असतो. सुट्या पैशांसाठीं कधीं तोंड वेंगाडत तर नाहींच, पण आपल्याला शंभराची नोट सुटी करून हवी असली तर आनंदानें दहादहाच्या दहा नोटा काढून देतो. मुख्य म्हणजे विनोदाला चटकन दाद देतो. त्या दिवशीं मी त्याला दरडावून विचारलें काय हो तुम्हीं सगळ्यांनाच कां तिकीट देत नाहीं? एकाला देतां दुसर्‍याला विनातिकीट नेतां असें का? पण माझी नजर कुठें होती तें त्या हजरजबाबी आणि चाणाक्ष वाहकानें - कंडक्टरनें हेरलें होते.  माझी नजर प्रवासी भरून सुटत असणार्‍या बसवर बसलेल्या दोन कावळ्यांवर होती. ते दोघे आमच्या स्टाफपैकीं आहेत म्हणाला. बसमध्यें वाचलेलीं हातांतल्या पुस्तकाचीं पानेंहि छान निघालीं होतीं.


कार्यालयांत पोहोंचून नुकताच स्थानापन्न झालों होतों. सकाळचे नऊ वाजून चौतीस मिनिटें. संगणक सुरुं करणार तोंच नुकतीच येत असलेली योगिता जागेवर जाण्याआधीं माझा दरवाजा किलकिला करून विचारते, "आज काय डब्यांत?"


"कामाला लाग आधीं. जेमतेम साडेनऊ वाजलेत. खायला येते का कामाला? जागेवर बसायच्या आधीं डब्यात काय म्हणून विचारते आहे. यायची वेळ केव्हांच होऊन गेली. तुलसीऽऽ, इसका चार मिनिट का पगार काटो." मीं.


"सांगा नंऽऽ. खूप भूक लागली आहे. आज नाश्ता करायला वेळच नाहीं मिळाला."


"केल्यानें होतें रे आधीं केलेंचि पाहिजे. तुझ्या डबा पार्टनरशीं आज कट्टी वाटतें?" डब्यातले कोलंबीचें नाहींतर माशाचें कालवण, बोंबील, करंदी, बांगडा, पापलेट, मांदेली, सुके बोंबील इ. तिला तांदळाच्या भाकरीवर दिल्याखेरीज मेलवीनच्या घशांत उतरत नसे. त्याच्या डब्यातील हे पदार्थ देखणे असतात. अर्थात मीं शाकाहारी असल्यामुळें मला त्याचें अप्रूप नाहीं. पातळ, पांढरीफेक आणि मऊरेशमी भाकरी मात्र मीं खाल्ली आहे.


"मेलवीन आज सुटीवर. आज मढला जत्रा आहे. सगळे दारू पिऊन पडणार. खाली बघाऽऽ, फक्त लोबो असेल. बाकी सगळे मढला पिऊन टाईट असतील."


मीं माझ्या खुर्चीखालीं पाहिले.


"स्टोअरमध्यें होऽऽ. तुमच्या खुर्चीखाली नाहीं. बोना, मारिओऽ कोऽऽणी नसणाऽऽर. डिसोझा कंपनी सऽऽगळी पिऊन टाईट. एकजात सग्गळे बेवडे मेले. उद्या बघा, कोऽऽणी वर येणार नाहीं. तोंडाला दारूचा वास येईल म्हणून."


"मेलविनला बिचार्‍याला नांवें कशाला ठेवतेस? त्याच्या डब्यातलं बरं गोड लागतं?"


"मस्त रस्सा बनवते त्याची बायको. मासळी पण एकदम ताजी असते. मला वाटलं तुमच्या डब्यांत टोमॅटो आम्लेट असेल. तर निघाली केळ्याची भाजी. (केल्यानें होतें रे चा अर्थ या चतुर महिलेला ताबडतोब कळला) आग लावा तुमच्या तोंडाला. उद्यां घेऊन या. नाहींतर येऊं नका हं हपिसात. कांहींतरी मागवूंया कां आतां? आपापल्या पैशानें."


"काय मागवणार?"


"रज्जोऽऽ आज सुधा विहारमधें काय आहे बघ?" रेजिनाचें या लोकांनीं रज्जो करून टाकलें होतें.


"कटलेट असेल तरच मी खाईन. पंजाबी समोसा नको." मी. या हॉटेलांत टोमॅटो ऑम्लेट आणि पंजाबी समोसा आलटून पालटून एक दिवसआड असे.


"खातांना तुमचे नखरेच जास्त."


"मूळच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला नखरे खुलवतातच मुळीं. जा आता जाऽऽ. विचारे बाईऽऽ, विचार करून भीक मागून न्याहारीला पैसे जमा करा." डोळे वटारत ती त्रस्त समंधीण खादाडीची सोय करायला गेली. ही बया हौशीनें खाते. मस्त एकेकाची ऑर्डर घेते, हॉटेलमधून खायला मागवते आणि प्रत्येकाकडून चोख हिशेबानें पैसे घेते. कधीं आमच्यांतल्याच एखाद्याल कापते नाहींतर पैसे जमा करते. मग चारपांच जणाचीं कोंडाळीं आलटून पालटून जेवणघरांत जाऊन गप्पा मारत हादडतात. कार्यालयहि ओस पडत नाहीं आणि खादाडीहि होते. 


संगणकांतले ताजे ‘उत्पादन शुल्क अभिलेख’ तपासणें, एकेकाला कामें देणें, नवीन देकार = कोटेशन्स टंकायला देणें, दूरध्वनीवरून उत्तरें देणें, टंकलेल्या देकारांत मध्यें किंमत सूचीवरून किंमती टाकणें, नवीन सुट्या भागांच्या किंमती ठरवणें - उत्पादन पद्धतीवरून आंकडेमोडून किंमती टाकणें, विकतच्या भागांचे ताजे देकार घेणें आणि कामाच्या ओघांत एकेकाची जमेल तशी टोपी उडवणें तसेंच खादाडी, यांत अर्धा दिवस कसा गेला कळलें नाहीं.


- X - X - X -


जेवणाच्या सुटींत मीं एकटाच माझ्या जागेवरच जेवत असे. जेवतांना मला पुस्तक वाचायची सवय आहे. कधींतरी कोणीतरी डोकावतें आणि चार शब्द बोलून गंमत करून जातें. असेंच जेवतांना पुस्तक वाचतांना त्या दिवशीं शोभा आली. दारांतून तोंड घालून बाहेरूनच म्हणाली, "पुस्तक बंद करा तें. ठसका लागेल. जेवतांना वाचूं नये. माझे बाबा आले नाऽऽ, तर फाडूनच टाकतील पुस्तक."


"अच्छा, म्हणजे वेडाचे झटके तुम्हांला बाबांच्याकडून मिळाले. आतां लौकर जाऊन जेवा. गेल्या पंचवीस सेकंदांत तुम्हीं कांहीं खाल्लेलें नाहीं त्यामुळें तुमचें वजन पन्नास ग्रॅमनें कमी झालें बघा." मीं.


"आणखी बोललांत तर खरंच फाडून टाकीन हां पुस्तक." शोभा.


"एवढा राग आलाच आहे तर रागानें खाली उडी टाका कीं. दुसरा मजला आहे."


"खातांना अशी बडबड करतां ना, म्हणून तें अंगाला लागत नाहीं खाल्लेलं. सुके बोंबील कुठले."


- X - X - X -


दुपारचें जेवण झाल्याला तासभर होऊन गेला. वा! काम बरेंच झालें. जवळजवळ तीनेक तासांचें काम तासाभरांत झालें. संगणकानेंहि दगा दिला नाहीं. बर्‍यापैकीं वेगानें चालला. दूरध्वनीनें पण फारसा त्रास दिला नाहीं. मोजून तीन आले. तेहि बाहेरून. इथलेंहि कोणी काहीं अडचण घेऊन आलें नाहीं. बाहेर आवाजहि नाहीं. सगळे मेले कीं काय? पण आतां थोडी शरीराची हालचाल व्हायला पाहिजे. डोळ्यांना पण विश्रांति पाहिजे ना. काय करावें? हं कोणाची तरी खोड काढावी. मेंदूला पण तजेला येईल. त्याला पण बेट्याला क्षणभर विश्रांति - ब्रेक नको कां?


थोडे आळोखेपिळोखे दिले. हातपाय ताणून ठीक केले. हाताच्या तळव्यानें डोळे गोलाकार चोळले, कुत्र्यामांजरासारखें आपल्यालाहि अंग झाडतां आलें असतें तर किती बरें झाले असतें.


तेवढ्यांत केबिनचें दार उघडून शोभानें तोंड आंत घालून बाहेरूनच विचारलें, "काय एवढं काम चाललंय? उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक मिळवणार काय?"


"खरंच मिळालं तर जळूं नका मग." मी.


"हा उजेड तुमच्या कामाचाच काय?" शोभा.


आतां मीं उठून बाहेर आलों.


 "किती वाजले?" मीं.


"दोन वीस." शोभा.


"तुम्हाला विचारलं? कां बोललांत? बेशिस्त. थोबाडीत मारून घ्या आतां. आणि तुमच्या घड्याळांत दोन वीस नाहीं चार वीस वाजतात."


"नाहीं घेत मारून थोबाडींत. चार वीस तुमच्याच घड्याळांत वाजतात. काय कराल?" झांशीच्या राणीच्या भूमिकेंत शोभा.


"दुर्गे दुर्घट भारी" मी.


"बोला काय कराल?" शोभा आतां रणरागिणीच्या आवेशांत.


"मीं कांहीं करायलाच नको. तुमच्या रिकाम्या डोक्याचीं शंभर शकलें होऊन तुमच्याच पायावर पडतील." मी.


"हा! हा!! हा!!!" विलास. सगळ्यांनाच आतां उकळ्या फुटल्या. सुमती तुलसी मात्र गंमत पाहात. त्यांना फारसें मराठी कळत नाहीं. त्या नंतर हिंदीतून विचारून घेतात आणि मग हसतात.


"शोभा, तुम्हांला स्वतःला नसेल जमत तर मी करीन मदत, थोबाडीत मारायला." सचीन.


शोभाचा वडा. पण आतां ती भडकली."ये थोबाडीत मारायला इकडे. जरा तुझ्याकडे बघ आणि माझ्याकडे बघ. हात नुसता खेचला ना, तर खांद्यातून तुटून येईल. आणि तू दात काढूं नकोस रे मेलवीन. घशात घालीन एकदां कधीतरी. आणि (मला) तुम्हीं हो? तिकडे आत बसून काम करा. इकडेतिकडे टिवल्याबावल्या करीत फिरूं नका. हे कॉलेज नाहींऽऽ ऑफिस आहे." ही बया भडकली कीं लहान मुलीसारखी भांडते. हिला बारावी झालेली मुलगी आहे हें खरेंच वाटत नाहीं.


"चूप! एक शब्द बोलूं नका!! हें ऑफिस आहे, मासळीबाजार नाही." मीं आवाज चढवून खोटेंखोटें दरडावलें.


"मोगॅंबो खूष हुआ! हा! हा!! हा!!! विलास.


- X - X - X -


नंतर मात्र माझीच फ झाली. माझेंच अस्त्र माझ्यावर उलटलें. एक नवीन रिकामी फाईल हवी होती. मेलवीन सचीन आतां दोघेहि बाहेर गेले होते. मीं बाहेर आलों. "रिकाम्या पातळ फाईल कुठें आहेत?"


"आतल्या कपाटात आहेत." योगिता.


"तुला विचारलं? घे थोबाडीत मारून." मीं अनवधानानें सवयीनें बोललों.


योगितानें फक्त एक मारक्या म्हशीची नजर टाकली.


आंत जेवणघरांत वा प्रसाधनांत जातांना मला डावीकडच्या आरेखन - ड्रॉईंग - कार्यालयातून जावें लागतें. गेलों फाईल आणायला.


"ढिशूंऽऽ. मी पहिली गोळी घातली. आतां तुम्हीं मेलांत." आरेखक - ड्राफ्ट्समन - बागवे. मीं आणि बागवे आम्हीं दिवसांतून एकदोनदां बोटांचें पिस्तूल करून एकमेकांना गोळ्या घालतों. त्यांच्या आणि आमच्या विभागांच्या मध्यें असलेल्या लाकडी दरवाजाला जमिनीपासून पांच फूटांवर मध्यभागीं एक चार इंच गुणिले चार इंच चौकोनी कांच आहे. आमच्या कक्षांतला माणूस येतांना बागवेंना मान वर केल्याबरोबर दिसतो. कधीं त्यांचें लक्ष नसतें, कधीं माझें.


"आज मीं बुलेटप्रूफ जाकीट घातलें आहे. तेव्हां ढिशूंऽऽ! ही खा माझी गोळी." मीं.


"मीं तुमच्या डोक्यांत गोळी घातली आहे. तेव्हां तुम्हींच आधीं मेलांत. कांऽऽहीं उपयोग नाहीं जाकिटाचा." बागवे


"आतां मीं डोकं कसं चालवूं?" मीं.


"होतंच कुठें आधीं?" स्वाती.


"एऽऽ सव्वा तीऽऽ! गऽऽप!" मीं.


"हा! हा!! हा!!!" मनोहर. स्वातीनें आम्हां दोघांवर डोळे वटारले.


माझ्या दुर्दैवानें आंतल्या कपाटांत मला फाईल्स मिळाल्या नाहीं. मीं परत आलों. "नाहींत फाईल्स तिथें. कुठें आहे?"


"कोणाला विचारलॅंत? मला? पण मी नाहीं सांगणार. आणि आतां कोणीहि सांगणार नाहीं. गुपचुप आंत जाऊन बसा. मेलविन आल्यावर नंतर पाठवून देते. कोणीहि सांगूं नका रे. रवी, कुणाल, कोणी फितूर झालांत नाऽऽ, तर याद राखा." योगिता.


"त्यांचे शहाण्णव दांत पाडणार?" विलास.


"दोघांचे मिळून चौसष्टच होणार. कशाला रे तू अकाउंटमध्यें भर्ती झालास, साधी बेरीज येत नाहीं?" शोभा.


"त्यांत तुमचे बत्तीस शोभा. झाले शहाण्णव? मोगॅंबो खूष हुआ." विलास.


मी टाळ्या वाजवल्या. हशा पिकला. सेवानिवृत्त झालों तरी अजूनहि मला ठाऊक नाहीं त्या रिकाम्या फाईल्स कुठें ठेवतात तें. या सगळ्या गमतीजमती चालतांना कामाचा वेळ फुकट जात नाहीं पण वातावरण मात्र खेळीमेळीचें राहातें अणि कामाचा दबाव जाणवत नाहीं. त्यामुळें संचालकहि कधीं आक्षेप घेत नसत, वर थांबून विनोदाला दाद देत. गंमत म्हणजे त्यामुळें कर्मचार्‍यांना घरीं चैन पडत नाहीं व ते फारसे दांड्या मारीत नाहींत. जेवतांना सगळे डब्यातल्या पदार्थांची देवाणघेवाण करतात त्यामुळें दुपारच्या जेवणांत भरपूर विविधता येते. योगिताला ती घरीं असली कीं मोजक्या पदार्थांचें दुपारचें जेवण जात नाहीं. वर तिची दोन तान्हीं मुलें तिला अख्खा दिवस पिडतात तें वेगळेंच.


- X - X - X -


जेवणघरांत तर नुसता मासळीबाजार असतो. कोण कोणाची केव्हां टोपी उडवेल भरोसा नसतो. एकदां एक रव्याचा आणि एक बेसनचा लाडू शिल्लक होता. ओरिना डिसिल्व्हानें सुमती आणि तुलसीला विचारलें, "तुमच्या पैकीं जी ढ असेल तिला रव्याचा आणि मठ्ठ असेल तिला बेसनचा लाडू मिळेल." एकीनें आपण ढ असल्याचें व दुसरीनें मठ्ठ असल्याचें जाहीर केलें. कधीं कधीं एखाद्या वादग्रस्त विषयावर गरमागरम चर्चा, चांऽऽगली खडाजंगी होते.


आतां दुपारीं जेवतांना अचानक कधीं कधीं सगळ्यांची आठवण येते. सचीनच्या आणि विलासच्या डब्यातल्या उसळी, राशिनकरांच्या डब्यातली पाटवड्यांची आमटी आणि गुलाबजाम, योगिताकडची बटाट्याची पिवळी इंटरनॅशनल भाजी, बागवेकडचें अळू आणि गाजराचा हलवा, शोभाकडचे लाडू, केरळी भगिनी सुमती आणि तुलसीकडच्या इडल्या आणि इडीअप्पम याची आठवण येते. मेलवीन, मारिओ, अनिता परेरा यांच्याकडे नाताळांत आपल्याकडे दिवाळींत करतात तस्सेच लाडूकरंज्या, शेवचकल्या इ. पदार्थ करतात. पण त्या ईस्ट इंडियनांचे म्हणजे मुंबईच्या आणि वसईच्या मूळच्या ख्रिस्ती लोकांचे कांहीं खास पदार्थ आहेत. आपल्या नारळी पाकासारखी मेलवीनकडची रॉसबेरीची वडी, मारिओकडची पेरूची वडी, अनिताकडच्या या दोन्हीं वड्यांबरोबरचें आपल्या शंकरपाळीसारखें पण बोराच्या आकाराचें कलकल या सगळ्याची आठवण येते. केक तर सर्वांकडे असेच.


बोना डिसोझा तर एकदम राजा माणूस. मुळांत सुखवस्तु. त्यातून हा प्रचंड उद्योगी. पॅकिंगसाठीं लाकडाचीं खोकीं पुरव, मढच्या घराशेजारीं पर्यटकांसाठीं हॉटेल काढ अशा उद्योगामुळें त्याचा आणखी उत्कर्ष झालेला. पण आपण नुसतें मढला येणार म्हणावें. त्याच्याकडे खाण्या‘पिण्या’ची घसघशीत सोय करणारच. मत्स्यप्रेमी असल्यास असल्यास मासे सढळ हस्तें खायला घालेल. आदरातिथ्य केल्याशिवाय सोडणार नाहीं. पण कार्यांलयांत मात्र सदा कामांत बुडालेला. कोणत्याहि कामाला कधीं रडणार नाहीं. अतिशय सकारात्मक दृष्टिकोन. बोलण्यांतला विनोद विसंगति मात्र वाह्यात काकदृष्टीनें टिपणार आणि चटकन हसून दाद देणार. कोणाचा मोरू बनवायलाहि हा पुढें. पण सांभाळूनहि घेणार.


कधीं सणासुदीला "उद्यां कोणीहि डबा आणायचा नाहीं, जेवायला बाहेर जायचें" असें विलास वा योगिता फर्मान काढत आणि मग सर्वजण तुंगा पॅराडाईज, सन सिटी, कृष्णा लंच होम यांपैकीं एखाद्या हॉटेलांत जात असूं. जोडीला हितेश जैन, जगन्नाथन, कृणाल, समीर, वगैरे अभियंते, अकाउंटमधले राशिनकर, विलास, योगिता, शोभा, रवी आचार्य, आरेखनातले संजय सूर्यवंशी, बागवे, स्वाती, मनोहर, आदेश, दूरध्वनी चालिका रेजिना, कविता पण येत आणि गप्पागोष्टींत फोडणी घालत.

असे कार्यालयातले एकेक विसाव्याचे क्षण कधींतरी आठवतात आणि मन प्रसन्न होतें. कधीं कार्यालयीन कामांतलें कांहींतरी विचारायला नाहींतर जेवणाच्या सुट्टींत आठवण आल्यावर एखादा कोणतरी मला दूरध्वनी लावतो आणि एकामागून एक सऽऽगळे भरभरून बोलतात.

पूर्वप्रकाशन:मनोगत.कॉम, १८-०१-२०१०

Wednesday, 3 March 2010

मुंबईचे दिवस ७ असाही एक स्वातंत्र्यदिन

जुलै १९९७.


"पपा पपा एक काम आहे." चिरंजीव.


"काय?" मी.


"हळू बोल आई ऐकेल."


"टीचरनी रिमार्क दिला आहे. कॅलेंडर बघ. सही कर आणि तुला शाळेत बोलावलं आहे."


"काय झालं?"


"हॅ हॅ हॅ हॅ!"


????


"हॅ हॅ हॅ हॅ!"


"अरे गाढवा शाळा सुरु होईन महिना पण झाला नाही आणि रिमार्क दिला? आणि मला बोलावलं तरी हसतोस काय?"


"पपा! आम्ही हसतो म्हणून बोलावलं. हसायलाच येतं?"


????


"नवीन मिस आली आहे जॉग्रफीला."


"मग?"


"ती चकणी आहे. तिला बघून आम्हाला हसायलाच येतं! सगळी मुलं हसतात. कोणाकडे बघते ते कळतच नाही. एक डोळा लेफ्टला दुसरा राईटला."


आता मला पण हसायला आलं. "मग सगळी मुलं हसत असणार!"


"हो!"


"रिमार्क किती जणांना दिला?"


"फक्त मला."


????


"काय मायती (माहिती)!"


आतां माझा पारा किंचित चढला. इतकी मुलं वर्गांत असतांना यानेंच काय पाप केलें होतें. पण  वीणा मेनन मिसेस तर चांगली आहे. ती तर मुळींच पार्शालिटी करणार नाहीं. मरो! उद्यांच बघूंया.


"असू दे. येतो उद्या आणि भेटतो. कोणाला भेटायचं?"


"मनीषा मिसेस."


"पण तुम्हाला कुठे आहे मनीषा?"


"ती हेडमिस्ट्रेस आहे."


"पण रिमार्क तर क्लास टीचरनी दिला आहे. नायर मिसेसनी!"


"त्या जॉग्रफीच्या मिसनी कंप्लेन केली हेडमिस्ट्रेसकडे. नायर मिसेसनी सांगितलं की मनीषा मिसेसला भेटायला सांग म्हणून. आईला बोलू नको."


"हो."


- X - X - X -


"मॉर्निग टीचर!"


"व्हेरी गुडमॉर्निंग!" मनीषाबाई प्रसन्न हसल्या. माझा ताण कमी झाला.


"येस मिसेस? एनीथिंग सिरीयस?"


"नॉट सीरियस ऍज सच, बट अ हेडेक फॉऽऽ मी! ऍन अनयूज्वल, क्वीअऽऽ प्रॉब्लेम!" आतां तिच्या चेहर्‍यावर तणाव आणि संकोच.


"यू लुक प्रीटी टेऽऽन्स! प्लीज स्पीक फ्रीऽऽली. नो फॉर्मॅलिटीज फ्लीज! ओऽऽपन अप प्लीऽऽज!"


आतां तिचा ताण बराचसा निवळला. घडाघडा बोलायला लागली. सांगायला लागली कीं मिस चकणी आहे म्हणून मुलें हसतात. याच नाहीं. सगळ्याच वर्गातलीं. मिस तक्रार करते कीं मुलें हसायला लागली कीं तिला बोलणें सुचत नाहीं. मग ती एखाद्या वेळीं बोलायला चुकते. मग मुलें अजून हसतात. तिनें आत्मविश्वास गमावला आहे. तास संपला कीं स्टाफरूममध्यें रडते. खरे तर मुलें शांत राहायला पाहिजेत ही तिची अपेक्षा रास्त आहे. पण इतक्या वर्गातल्या प्रत्येक मुलामुलीला कशी पनीशमेंट करणार? काय करावें सुचत नाहीं.


ती बोलतांबोलतां माझें विचारचक्र वेगानें फिरायला लागलें होतें.


"लुक मिसेस! चिल्ड्रन विल बिहेव लाईक चिल्ड्रन. दे कॅनॉट बिहेव्ह लाईक ग्रोऽऽन अप्स. ईव्हन दॅट्स द ब्यूटी ऑफ दॅट एऽऽज. यू ऍंड मी कॅनॉट ब्रिंग दोज डेज बॅक." माझी फिरंगी भाषेंतली टकळी आगाऊपणें चालूच.
"चकणेपणा घरीं ठेवून ती शाळेंत येऊन शकणार नाहीं. मुलें वाईट नसतात. तीहि वाईट नसेलच. दोघे एकमेकांचे शत्रूहि नाहींत. तिरळे डोळे बघून मुलांना आपोआपच हसूं येतं. उत्तम हेंच आहे कीं त्या मिसनें मन शांत ठेवून शिकवत राहावें. मुलं हसतात त्याकडे दुर्लक्ष करावें. आणि बोलण्यांत चुका करूं नयेत. हें बोलणं सोपं आहे पण तिनें घरीं पण भरपूर वेळ देऊन याचा सराव करायला पाहिजे. थोड्या दिवसांनीं मुलांना तिच्या चकणेपणाची संवय होईल. मग मुलांना सहवासानें तिच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल. मुलंहि हसणार नाहींत आणि तिची समस्या सुटेल. शाळेला सुटी पडली कीं तिनें वैद्यकीय शस्त्रक्रिया करून तिरळा डोळा सरळ करून घ्यावा हें बरें. नाहींतर पुढल्या वर्षीं हीच समस्या पुन्हां आ वासेल."


"सोऽऽ नाईस ऑफ यू! आय् ऍम सोऽऽ मच रिलीव्हड! मेनी मेनी थॅंक्स. आय् वॉज वंऽऽडरिंग वॉट टू डूऽऽ! थॅंक्स वन्स अगेन!"


"आणखी एक गोष्ट. तुम्हीं वर्गांत जाऊन मुलांना समजावा कीं निसर्गानें तिला असेंच बनवलें आहे. तुम्हीं हसलांत तर तिला वाईट वाटेल ना. आणि तिला कलेक्टिव्हली सॉरी म्हणा. मुलांनीं कलेक्टिव्हली सॉरी म्हटलं कीं मिसचा मान पण राहील आणि राग पण निवळेल."


बाईंच्या चेहर्‍यावर समाधान झळकलें.


"पण एक विचारतों मनीषा मिसेस, राग मानूं नका, पण फक्त आमच्याच मुलाला रिमार्क कां?"


"व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण वीणा मेनन मिसेस म्हणाल्या कीं एकदोन पेरेंटस् शीं बोलून चर्चा करून काय करायचें तें ठरवा. तिनें तुमचें नांव रेकमेंड केलें होतें. पण तुमच्याशीं बोलल्यावर आता आणखी कोणाशीं बोलायची जरूरच नाहीं."


"हा मीं माझा बहुमान समजूं कां? पण त्याला वाईट वाटलें कीं फक्त त्यालाच रिमार्क म्हणून." मीं पुन्हां इंग्रजी फाडलें.


"मी काळजी घेईन त्याची. आत्तां बोलतें पाहा त्याच्याशीं."


"बाय्!"


"बाय्! सो नाईस ऑफ यू!"


- X - X - X -


ऑगस्ट १९९७.


"पपा पपा एक काम आहे."


"काय?"


"टीचरनी विचारलं आहे कीं १५ ऑगस्टला तू फ्री आहेस का म्हणून?"


"परत? आता काय झालं? चकणीला हसत नाहींस ना?"


"आता कोणालाच हसायला येत नाही तिला बघून. सवय झाली."


"१५ ऑगस्टला तू फ्री आहेस का पयलं सांग."


"हो आहे फ्री. पण कशाला?"


"ढॅण् टॅ ढॅण्! याऽ हूऽऽऽऽ!"


????


"१५ ऑगस्टला तुला शाळेत बोलवणार आहेत. प्राईज डिस्ट्रीब्यूशनला चीफ गेस्ट म्हणून. इंडिपेंडन्स डे ची गोल्डन ज्यूबिली आहे ना, म्हणून."


"अरे नेते लोक असतात तिथे. मी नाही येणार."


"आमच्या शाळेत नसतात कधी नेता लोक. पेरेंट्सनाच बोलवतात चीफ गेस्ट म्हणून. तू येणार असशील तर सॅटऽडेला टीचर आणि पीटी चे सर येतील ऑफिशियल इन्व्हिटेशन द्यायला."


"पण विचार कोण नेतेबिते येणार आहेत काय म्हणून. असतील तर मीं नाहीं येणार."


- X - X - X -


"पपा, फक्त मिसेस गंगाधरन, एक्स लायब्ररीयन ऑफ टी आय् एफ् आर् येणार गेस्ट ऑफ ऑनऽ म्हणून. नेते कोणी नाहीत. सांगूऽऽ तू येणार म्हणून?"


"हो!"


"याहूऽऽऽ. तू हायवे कडून शाळेच्या गेटवर यायचं. गंगाधरन मॅडम पण तिथें असणार. आणि तिथें ड्रम, ट्रंपेट आणि ब्यूगल वाजवणारी मुलं आणि आणखी ५० मुलं असणार. ५० ईयर्स झाली ना इंडिपेंडन्सला, म्हणून. ड्रमवाले सर्वांत पुढें. मग त्यांच्यामागें ५ X ५ = २५ मुलं. मग तू आणि गेस्ट ऑफ ऑनऽ मग मागे अजून २५ मुलं मग. मग ढुमढूम च्या तालावर लेफ्ट राईट करत फ्लॅगसमोर जायचं. तू फ्लॅग वर चढवायचा, मग ड्रमच्या र्‍हिदमवर जन गण मन. मग तुझ स्पीच, मग गेस्ट ऑफ ऑनरचं स्पीच आणि मग प्राईज डिस्ट्रीब्यूशन. आता बघ शाळेत काय वट आहे माझी. सॅटऽडेला टीचर आणि पीटी चे सर येतील ऑफिशियल इन्व्हिटेशन द्यायला."


सोहळा मस्त रंगला. ड्रमचा आवाज इतका जोरदार होता कीं शाळकरी मुलें वाजवताहेत म्हणून सांगितलें तर विश्वासच बसणार नाहीं. सौ. गंगाधरन त्या १९४७ सालच्या स्वातंत्र्यदिनीं आठनऊ वर्षांच्या होत्या. त्या दिवसाच्या आठवणीनें त्या अगदीं भारावून गेल्या होत्या आणि भरभरून बोलत होत्या. माझाहि रथ दोन अंगुळें वर हवेंत होताच. त्यांच्या बडबडीनें तो आणखी दोन अंगुळें वर गेला. उत्साहानें छोटेंसेंच पण जोरदार भाषण ठोकलें आणि भरपूर टाळ्या मिळवल्या. जसा आखला होता तस्साच मस्त सोहळा झाला. वयानें, शिक्षणानें आणि ज्ञानानें त्या श्रेष्ठ असल्याने मी त्यांना योग्य तो सन्मान दिला. त्यामुळें कार्यक्रमाची शोभा वाढली. खरें तर त्यांनाच चीफ गेस्ट करायला हवें होतें. पण कदाचित जेंडर बायसमुळें मीं झालों असणार. भारत नांवाच्या एका पाचवीतल्या मुलानें दणदणीत भाषण केलें. पण सर्वांत खणखणीत आणि जोरदार भाषण मात्र माझेंच होतें.


आजहि १५ ऑगस्टला अचानक आजूबाजूचें सारें गायब होतें. मी तस्साच ड्रमच्या तालावर तिरंग्याकडे खाडखाड चालत जातो, प्रास्ताविक चालू असतांना सौ. गंगाधरनचे दाक्षिणात्य उच्चारातले ते मंतरलेले शब्द ऐकूं येतात, तीं भारलेलीं जोरदार भाषणें आठवतात. चिरंजिवाचा तो अभिमानानें फुललेला चेहरा आठवतो आणि आठवणींचे आभाळ मनांत मावत नाहीं. जय हिंद.


पूर्वप्रकाशन: मनोगत.कॉम, १८-०८-२००९.

Tuesday, 2 March 2010

मुंबईचे दिवस ६ आठवणींचे कवडसे

कांहीं दिवसांपूर्वीं रेलवेनें दादरला जात होतो. दुपारीं साडेतीनचा सुमार. सौ स्त्रियांच्या डब्यात गेली. रविवार असल्यामुळें डब्यात शुकशुकाट. मालाडला गाडीत बसलों. डब्याच्या दोन्हीं बाजूंना हिरवे डेकोरेटिव्ह लॅमिनेट ऊर्फ सनमायका. त्याच्याशीं काटकोनांत असलेल्या लोखंडी पार्टिशनवर हिरव्या एनॅमलची पुटे चढवलेली. हिरव्या रेक्झीनची आसनें. खिडकींत ऊन असल्यामुळें मीं खिडकीपासून दूर, कडेच्या तिसर्‍या आसनावर बसलों. गोरेगांवला बाजूला एक नवपरिणित जोडपें येऊन बसलें. माझ्या बाजुला पुरूष आणि त्यापलीकडे खिडकींत स्त्री. पुरुषानें फवारलेल्या ‘ब्लू फॉर मेन’ मधूनहि स्त्रीनें लावलेल्या ‘टॉमी गर्ल’ दरवळत होतें. स्टेशन सोडलें तसे पश्चिमेकडे कललेल्या सूर्याची किरणे खिडकीतून आंत आलीं. आणि समोरच्या सीटमागील हिरव्या रंगाच्या पार्टिशनवर विविध रंगांचे टिकलीएवढे असंख्य कवडसे नाचूं लागले. गाडीच्या डब्याचा अचानक कायापालट झाला. आतां मीं पाचूच्या महालांत होतों.  त्या स्त्रीने बहुधा गळ्यांत रत्नहार घातला असावा. रंगीत कवडशांचा तो विभ्रम मला भूतकाळांत घेऊन गेला. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीं. मी असाच कधींतरी रविवारचा आईला भेटायला भाईंदरहून रेलवेनें दादरला जात असे. दुडदुडणारा वर्षासव्वावर्षाचा टिंगू माझ्यासोबत आणि सौ. स्त्रियांच्या डब्यात. दुडदुडणार्‍या बालकाला इंग्रजीत टॉड्ड्लर असा मस्त शब्द आहे. तोहि आठवला. तेव्हा पण अशीच प्रकाशाची रांगोळी पार्टिशनवर पडली होती आणि टिंगू समोरच्या त्या रिकाम्या तीन सीटवर इकडे तिकडे पळत उड्या मारत ते कवडसे पकडण्याचा प्रयत्न करीत होता. अख्खा डबा त्याची गंमत पाहात होता. त्यातच काहीतरी कारणानें पंधरा वीस मिनिटे गाडी एका जागी खोळंबून उभी होती. थोड्या वेळानें उन्हाची दिशा बदलल्यावर कवडसे गेले. मग दुसरा खेळ.  तर्जनी, मधलें बोट आणि अंगठा जुळवून मीं हरणाचें तोंड केलें. उरलेलीं दोन बोटें हरणाचे कान. टिंगूनें पण तसेंच केलें. मग माझें हरिण त्याच्या हरणाचा चावा घ्यायचा प्रयत्न करायला लागे. त्याचें हरिण निसटे. निसटलें कीं तो खुदखुदे. मग त्याच्याबरोबर इतर प्रवासीहि खुदखुदायला लागले. चावा घेतला कीं तो आऊट. मग माझें हरिण पळणार व त्याचें चावा घेणार. खेळ मस्त रंगला. डब्यातल्या प्रवाशांची मस्त करमणूक. अर्धापाऊण तास कसा गेला कळलेंहि नाहीं.


कांहीं वर्षें आम्हीं भाईदरला राहायला होतों. (नंतर मालाडला गेलों) विरार लोकलला वेळ असला तर बोरिवलीपर्यंत जाऊन नंतर विरार लोकल पकडत असूं. एकदां असेंच रिकाम्या बोरिवली लोकलनें मी आणि दीडदोन वर्षांचा चिरंजीव असे दोघें दादरहून बोरिवलीला आलों. व फलाट क्र. ४ वर विरार लोकलची वाट पाहायला लागलों. हा माझ्या कडेवर. कांहीं मिनिटांनीं इतर रेलवे गाड्या पाहून झाल्यावर त्याच्या दृष्टीला माझ्या मागचा स्टॉल पडला. तिथल्या पेपरमिंटच्या गोळ्या त्याला दिसला. गोळी पाहिजे म्हणून त्यानें मागणी केली. तेवढ्यांत गाडी आली. चपळाईनें गाडीत चढून खिडकीत जागा पकडून बसलों. तोपयंत यानें गोळी पाहिजे म्हणून हट्ट करून मला बोचकारून केस ओढून माझा अवतार करून ठेवला. गाडी सुटतांना एक सरदारजी घुसला. कोणाला तरी शोधत होता, मग आमच्या समोरच्या सीटवर येऊन बसला. मराठींत म्हणाला, ‘बेटा, गोली जास्त खाऊं नको, नाहीतर उंदीर तुझे दात खाणार.’ त्याच्या दाढीमिशा पाहून टिंगू म्हणाला तो बुवा आहे, त्याला तूं मार. तो अति लौकर चुरुचुरु बोलायला लागला होता. मी म्हटलें तो चांगला बुवा आहे त्याला नमस्ते कर. तेवढ्यांत त्या सरदारजीनें मूठ उघडून गोळ्यांची पुडी समोर धरली. कोण कुठला सरदारजी, ना ओळख ना पाळख, पण फलाटावर दिसलेल्या अनोळखी छोट्याचा हट्ट पुरवायला गोळ्या घेऊन आला व कशीबशी धडपडत गाडी पकडून आम्हांला डबाभर शोधत समोर येऊन बसला. मुंबईचे हें अपरिचितांबद्दलहि दिसणारें सौजन्य, हें अगत्य, इतरत्र क्वचितच आढळेल. या बाबतींत मुंबई नक्कीच श्रीमंत आहे.


या सौजन्यावरून आठवलें. एकदां आमच्या संगणकाचा मॉनिटर बिघडला. डेवू मेकचा विचित्र नग होता. तेव्हां डेवू कंपनी बंद देखील पडली होती. दोघांतिघांनीं डोकें आपटलें होतें व दुरुस्त नव्हते करूं शकले. संजय टंकारिया नांवाचा एक गुजरती गृहस्थ दुरुस्त करूं शकेल असें कळलें. बोरिवलीलाच राहात होता. त्याला दूरध्वनि लावला. त्यानें लक्षणें विचारलीं व कोठें राहातां म्हणून विचारलें. आमच्या मालाडच्या घरापासून जेमतेम पांच किलोमीटर. तो म्हणाला, घरीं घेऊन याल तर बरें होईल. कितीहि गुंतागुंत असली तरी दुरुस्त होईल. एक आठवड्यांत देईन. म्हटलें बरें झालें. आदळला एकदाचा त्याच्या घरीं नेऊन. चार दिवसांनीं त्याचाच दूरध्वनि आला. दुरुस्त करून तयार आहे. घेऊन जा. दुरुस्तीची मजुरी रु. तीनशें फक्त. गेलों त्याच्या घरीं. निघतां निघतां पावसाची एक सर आली. म्हणाला काका बैठो. बारीश जाने दो. चायबाय पिओ हमारे साथ, बादमें जाओ. त्यानें मॉनिटर चालवून दाखवला. त्याचे सत्तरएक वयाचे वडील पण घरी होते. मराठी आणि गुजराती मिश्रित हिंदीतल्या गप्पा मस्त रंगल्या. चहा खाणें झाले. मॉनिटर त्यानेंच पॅक केला. थांबा म्हणाला. आपण कपडे चढवले. मीं मॉनिटर उचलायला लागलों तर त्यानें उचलूं दिला नाहीं. आपणच उचलला, दोन मजले उतरून खालीं रस्त्यावर आला, रस्ता पार करून रिक्षा ठरवली, रिक्षांत मॉनिटर ठेवला आणि अब बैठिये काका अशी कमरेंत झुकून विनंति केली. ती आठवण आली कीं मीं अजूनहि भारावून जातों. एका अनोळखी गुजराती माणसाचें हें सौजन्य.


मुंबईची माणसें तशी अगत्यशीलच. आणखी एक नमुना पाहा. साल सुमारें २००५ असावें. आमचे एक्साईज कन्सल्टंट श्री. बी. एच. जोशी. सेवानिवृत्त सहायक समाहर्ता ऊर्फ असिस्टंट कमिशनर. दूरध्वनी केला कीं तत्परतेनें उपस्थित होतात. तेव्हां महानगर टेलिफोन निगमच्या कृपेनें त्यांचा दूरध्वनी बरेच दिवस बंद होता. जुन्या काळांतले जोशीबुवा भ्रमणध्वनि अर्थात मोबाईल वापरत नसत. मग काय पत्ता घेतला आणि त्यांच्या घरीं निघालों. XXX इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व. कांदिवली स्थानकाला लगूनच लेव्हल क्रॉसिंगकडून पूर्वेला निघणारा रस्ता हा आकुर्ली रोड. पुलावरून आकुर्ली रोडला आलों. एक दुधाची डेअरी कम हॉटेल कम फरसाण दुकान लागलें. गल्ल्यावरच्या गृहस्थांना विचारलें कीं ती इमारत कुठें आहे. तो सदगृहस्थ गल्ल्यावरून बाहेर रस्त्यावर आला. त्याच्यामागोमाग मीं. त्यानें बोट दाखवलें. सिग्नल के पास वो राईट हॅंड कॉर्नर की चार माले की पिंक कलरकी बिल्डिंग दिखती है ना, वो रही आपकी बिल्डिंग. हें तो खरें म्हणजे गल्ल्यावरूनच सांगूं शकला असता. पण त्याची आपुलकीची भावना मोठी होती. ना ओळख ना पाळख, पण त्याच्या कळकट कपड्यांआडचें हें सौजन्य मुंबईत ठायीं ठायीं दिसतें. फक्त आपण नम्रपणें, हंसतमुखानें विचारलें पाहिजे. मार्केट इलाखा गुजरात्यांनींच व्यापलेला आहे. एखादी विशिष्ट वस्तू घ्यायची असेल आणि कुठें मिळतें हें ठाऊक नसेल. खासकरून एखादा मशीनचा विचित्र भाग, तर तो भाग घेऊन मुंबई मार्केटमध्यें एखाद्या गुजराथ्याच्या दुकानांत जावें. त्याला कळलें नाहीं वा ठाऊक नसेल तर तो सतरा जणांना बोलावून विचारेल, कोठें मिळतो तें समजून घेईल व बरोबर पत्ता सांगेल, त्या दुकानांत कसें जायचें तेंहि सांगेल आणि कदाचित दूरध्वनी क्रमांक देखील देईल. मग भले ती व्स्तू छोटीशी पांचसहा रुपयांची का असेना. उगीच नाहीं ऊठसूठ प्रत्येकजण मुंबईला धावत.


आतां वेगळी गम्मत. टिंगूला शाळेला मोठी सुट्टी पडली कीं आम्हीं मुंबईभर फिरत असूं. आज इथें तर उद्यां तिथें. तेव्हां पूर्व प्राथमिक शाळेंत - प्री-प्रायमरींत होता. तेव्हां असेच मत्स्यालय पाहून क्रीम सेंटरमध्यें ट्रिपल संडे आईसक्रीम खाल्लें आणि मलबार हिलवरच्या हॅंगिंग गार्डन मध्यें गेलों. तिथें झाडांना विविध प्राण्यांचे आकार दिलेले आहेत आणि आवाज घुमणारे सज्जे आहेत. तिथें फूटपाथवरून जातांजातांच एक माकडवाला समोरून आला. दोन मस्त रंगीबेरंगी कपडे घातलेलीं माकडें. टिंगू थांबला. माकडवाला देखील थांबला. बेटा इसका नाम धर्मेंद्र और उसका हेमा मालिनी. धर्मेंद्रनें रुबाबदार पुरुषाचे कपडे घातले होते तर हेमानें स्त्रीचे. कपडे पण मस्तच होते. जंप मारके दिखाओ. दोन्हीं माकडांनीं कोलांट्या मारल्या. टिंगू खूश. बाबा को शेकहॅंड दो. धर्मेंद्र हेमा दोघांनीहि शेकहॅंड दिला. बाबा के मम्मी को शेकहॅंड दो. दिला. बाबा के पप्पा को शेकहॅंड दो. मला मांजर सोडून सर्वच प्राण्यांची भिती वाटते. तरी तसें न दाखवतां शेकहॅंड दिला. आश्चर्य़ाचा जोरदार धक्का बसला. माकडांचे तळहात अगदीं तान्ह्या बाळाइतके मऊ होते. अगोदर कळलें असतें तर माकडिणीशींच लग्न केलें असतें. नंतर धर्मेंद्र, हेमा आणि माकडवाला असे तिघांनाहि टिंगूनें पैसे द्यायला लावले.


आतां माकडावरून आठवलें. जुना किस्सा. तेव्हां मीं जेमतेम वीसेक वर्षांचा होतो. म्हणजे साल १९७१-७२ वगैरे असावें. मुंबईहुन माथेरान लोकलगाडीनें जवळ वाटतें. बर्‍याच वेळां जात असूं. या वेळीं मी आणि माझा एकच समवयस्क मित्र - ताम्हणकर असे दोघेच.  आम्हीं जातांना येतांना नेरळवरून पायीं जात असूं. नेरळहून चढतांना कडक ऊन लागतें. तहान फार लागते. तहान भागवायला आम्हीं काकड्या व गाजरें नेत असूं. तेव्हां बाटलीबंद पाणी नसे. वाटेंत थांबलों. दगडावर बसून काकडीचा समाचार घेत होतों. मागून एक साताठ पोरींचा कळप आला व ‘भारत के नौजवान थक गये’ अशी मल्लिनाथी करून पुढें गेला. माथेरानला माकडांचा फार उपद्रव. नंतर माथेरानच्या बाजारांतून फिरतांना समोरून एक घोडा भरधाव पळत आला. त्याच्याबरोबरचा माणूस नव्हता. घोड्यावर एक भयभीत तरुणी किंचाळत असलेली. तिच्या एका हातांत उकडलेल्या शेंगांची पुडी आणि दुसर्‍या हातांत केक वा पेस्ट्री. मला मांजर वगळतां सर्वच प्राण्यांची भिती वाटते हें अगोदर आलेलें आहेच. मी घोड्याच्या मार्गातून बाजूला झालों. पण माझा मित्र ताम्हणकर, त्यानें घोड्याचा लगाम पकडून त्याला थांबवलें. घोडा ताम्हणकरनें झाडाखालीं नेऊन थांबवला. मला सांगायला लागला कीं तो घोडा बिथरलेला नव्हताच. त्या तरुणीच्या टाचा घोड्याला लागत होत्या व त्याला पळायचा इशारा मिळत होता. म्हणून घोडा पळत होता. मागून घोड्याबरोबरचा मुलगा आला. त्या मुलीनें सुस्कारा सोडला. तेवढ्यांत झाडावरून एक माकड आलें, तिच्या खांद्यावर क्षणार्ध बसलें आणि तिच्या हातांतला सगळा खाऊ घेऊन झाडावर पळून गेलें. ती मुलगी घाबरलेली होतीच. एवढी मोठी मुलगी आतां रडायलाच लागली. नंतर त्यांतहि आपण भर बाजारांत मूर्खासारखें लहान मुलीप्रमाणें रडतो आहोंत हें समजून तिला हसायला पण आलें. आजूबाजूच्या दुकानांतून चारपांच माणसांचे तिच्याकडे लक्ष गेलें होतेंच. रस्त्यावरील माझ्यासारखे आठदहा बघे होतेच. सर्वांची मस्त करमणूक झाली. मागून आणखी पांचसहा घोडे आले. सगळ्यांवर मुली. ती मुलगी ‘भारतके नौजवान’ मधली होती. मग मी फुशारकी मारली. भारतके नौजवान शूर होते हैं म्हणून.


खरें तर बरीवाईट माणसें सगळीकडेच असतात. आपण काय टिपावें तें आपल्या वृत्तीवर असतें. चांगलें उचलावें जमलें तर जतन करावें, त्याज्य असेल तें टाकावें हेंच खरें.

पूर्वप्रकाशन: मनोगत.कॉम:३१-०७-२००९.